सभासद आक्रमक : १२६ कर्मचारी घराच्या प्रतीक्षेत नागपूर : वन विभागातील गरीब कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर छत असावे, त्यांच्या हक्काचे घर असावे, या उद्देशाने १९६३ मध्ये फॉरेस्ट डिपार्टंमेट एम्प्लॉईज को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. या संस्थेची स्थापना करण्यात आली. शिवाय या संस्थेच्या माध्यमातून सेमिनरी हिल्स परिसरात फ्लॅट स्कीम उभारण्यात आली. परंतु ही योजना उभी होताच १९९० मध्ये गलेलठ्ठ पगार असलेल्या भारतीय वनसेवेतील (आयएफएस) अधिकाऱ्यांनी संस्थेत घुसखोरी करून वन कर्मचाऱ्यांच्या फ्लॅटवर डल्ला मारला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार या योजनेत एकूण २२० फ्लॅट बांधण्यात आले. परंतु त्यापैकी ९० फ्लॅटवर आयएफएस अधिकाऱ्यांनी ताबा मिळविला असून, १०० फ्लॅट डीएफओ आणि एसीएफ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आहेत. शिवाय उर्वरित केवळ ३० फ्लॅटमध्ये गरीब वन कर्मचारी राहत आहेत. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश अधिकाऱ्यांची नागपुरात दुसरीकडे मोठ-मोठी घरे आहेत. त्यामुळे अनेकांनी येथील फ्लॅट दुसऱ्यांना भाड्याने दिले आहेत. अशा अधिकाऱ्यांची संख्या तब्बल ११३ असल्याची माहिती आहे. त्याचवेळी या संस्थेचे सभासद असलेल्या १२६ वन कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत फ्लॅट न मिळाल्याने त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. जाणकारांच्या मते, बहुतांश आयएफएस अधिकाऱ्यांना मोठ-मोठे शासकीय बंगले देण्यात आले आहेत, असे असताना अनेकांनी येथेसुद्धा फ्लॅट खरेदी करून ठेवला आहे. (प्रतिनिधी)अन्नत्याग-खुर्चीत्याग आंदोलन या योजनेतील हक्काच्या घरांपासून वंचित असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, संस्थेच्या पुढील सर्वसाधारण सभेत काळ््या फिती लावून अन्नत्याग व खुर्चीत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती वन विभाग कर्मचारी (गाळाविरहीत ) संग्राम समितीचे प्रमुख चंद्रकांत चिमोटे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, मुंबईतील आदर्श घोटाळ््याप्रमाणे वन विभागातील या गाळे वाटपात घोटाळा झाला आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गरीब कर्मचाऱ्यांचे फ्लॅट हडपले आहे. त्यामुळे गरीब कर्मचारी हा आपल्या हक्कासाठी मागील २० वर्षांपासून संघर्ष करीत असल्याचे ते म्हणाले.
वन कर्मचाऱ्यांच्या फ्लॅटवर अधिकाऱ्यांचा डल्ला!
By admin | Published: September 24, 2016 1:19 AM