आशीष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात त्यांच्याच अधिकाऱ्यांनी मोर्चा उघडला आहे. त्यामुळेच कदाचित शिक्षक दिवसनिमित्त देण्यात येणाऱ्या आदर्श अधिकारी पुरस्कारासाठी विद्यापीठातील एकाही अधिकाऱ्याने अर्जच केला नाही. सोमवारी पुरस्कार समारंभाप्रसंगी जेव्हा पुरस्कारासाठी निवडलेल्या लोकांच्या यादीत आदर्श अधिकारी पुरस्कार वर्गासाठी विद्यापीठातून एकाही अधिकाऱ्याचे नाव नव्हते, तेव्हा ही बाब उघडकीस आली.
लोकमतने या संदर्भात विचारपूस केली असता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांचे असे मानने आहे की, पुरस्कार निवडीत भेदभाव केला जातो. अनेक योग्य अधिकारी पुरस्कारासाठी पात्र असताना त्यांना पुरस्कार दिलाच जात नाही. ज्यांची शिफारस केली जाते, त्यांनाच पुरस्कार मिळतो. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी अनेक नावेही सांगितली. अनेक चांगले अधिकारी सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांची नावे कधीच पुरस्काराच्या यादीत समाविष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे यंदा कोणत्याच एकाही अधिकाऱ्याने पुरस्कारासाठी आपले नाव पाठविले नाही.
शिक्षक दिवसानिमित्त विद्यापीठातर्फे प्रत्येक वर्षी समारंभ आयोजित केला जातो. यात वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विद्यापीठ व संबंधित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श अधिकारी व कर्मचारी पुरस्कार प्रदान केले जातात.
आता नियम बदलण्याची तयारी
अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुरस्काराच्या नियमात बदल करण्याची तयारी केली जात आहे. सूत्रानुसार पुढच्या वर्षीपासून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविले जाणार नाहीत. त्याऐवजी संबंधित विभागप्रमुखांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले जाईल.