कमलेश वानखेडे
नागपूर : काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा नागपूर शहरात चांगला विस्तार झाला होता. सध्या एकच नगरसेवक आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर नागपुरातील कार्यकर्त्यांना पक्षाकडून ताकद दिली जात नाही. त्यांनी सुचविलेली कामे होत नाहीत. गेली अडीच वर्षे राज्यात राष्ट्रवादीचे १६ मंत्री होते. पण मंत्र्यांनी नागपूरकडे लक्षच दिले नाही, अशी वास्तविकता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर रोखठोकपणे मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी हॉटेल सेंटर पॉईंट येथे पार पडली. या बैठकीला पहिल्यांदाच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. संपर्क प्रमुख माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, माजी केंद्रीयमंत्री सुबोध मोहिते, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, माजी आ. प्रकाश गजभिये, सलिल देशमुख, प्रशांत पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शहर युवती अध्यक्ष पूनम रेवतकर यांनी पक्षाच्या कार्यक्रमात युवती संघटनेला स्थान नाही, पदाधिकारी मदत करीत नसल्याची खंत व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्याची विनंती पवार यांच्याकडे केली. महिला अध्यक्ष लक्ष्मी सावकर यांनी आजच्या बैठकीचाही निरोप मिळाला नसल्याचे सांगत पक्षाच्या प्रचारासाठी गाडी देण्याची विनंती केली. विद्यार्थी अध्यक्ष पराते यांनी अनिलबाबू होते तेव्हा ताकद मिळाली होती, आता थांबली, याकडे लक्ष वेधले. युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी महापालिकेच्या निवडणुकीत युवकांना संधी देण्याची गरज व्यक्त केली. प्रशांत बनकर यांनीही नागपुरातील उमेदवारांना पक्षाकडून ऐनवेळी रसद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. या सर्व खदखदीमध्ये शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी भर घातली. पेठे म्हणाले, राज्यात सत्ता असतानाही नागपुरातील पदाधिकाऱ्यांना काहीच मिळाले नाही. अडीच वर्षे मंत्री नागपुरात आले नाही. ते आपापल्या जिल्ह्यापुरते राहिले. कोणत्या मंत्र्यांनी नागपूरला काय दिले हे विचारले पाहिजे. आता तरी प्रमुख नेत्यांना नागपूरकडे लक्ष द्यायला सांगा, राज्यसभेच्या खासदारांना, विधान परिषदेच्या आमदारांना नागपुरात विकास निधी द्यायला सांगा, अशी विनंती पेठे यांनी पवार यांच्याकडे केली.
साहेब अदृश्य शक्ती वापरा, अनिल देशमुखांना बाहेर काढा !
- अनिल देशमुख हे पक्ष व कार्यकर्त्यांना ताकद द्यायचे. नागपुरात त्यांचा आधार होता. मात्र, भाजपने कट रचून त्यांना तुरुंगात डांबले आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. आपण आपली अदृश्य शक्ती वापरा व अनिल देशमुखांना बाहेर काढा, अशी विनंती बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. पवार यांनीही त्यांच्या भाषणात अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत भाजप आपली दहशत निर्माण करण्यासाठी असे प्रकार करीत असल्याचे सांगितले.
आघाडीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील : शरद पवार
काँग्रेस, शिवसेनेशी आघाडी करायची का, किती जागांवर करायची, कोणत्या अटींवर करायची की स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय नागपुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा. आपला जो निर्णय असेल तोच पक्षाचा निर्णय असेल, अशा शब्दात शरद पवार यांनी नागपुरातील पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. नागपुरात आपण लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढत नाही. त्यामुळे आपले चिन्ह लोकांपर्यंत पोहोचत नाही. यापुढे नागपुरातही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ. त्यासाठी मतदारसंघ निवडा व त्यासाठी नियोजन करून तयारी सुरू करा, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या. तर वळसे पाटील यांनी आपले नगरसेवक निवडून आले तर निश्चितच विधानसभाही मागता येईल, असे पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.