नागपूर : शासकीय अधिकाऱ्यांनी दैनंदिन येणाऱ्या आव्हानांचा सामना करीत नागरिकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केले. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (वनामती) येथील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम - २०१५ च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, प्रशिक्षण संस्थेचे संचालक सचिन कुर्वे, अभ्यासक्रम समन्वयक मिलिंद तारे व संस्थेचे जनसंपर्क अधिकारी पी. एन. राऊ त उपस्थित होते. क्षत्रिय पुढे म्हणाले, घटनेतील तरतुदीनुसार शासनाचे कामकाज चालते. अधिकाऱ्यांचे काम हे चाकोरीबद्घ असते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कामकाजाची सवय लावून घेतली पाहिजे. कार्यालयीन दस्तऐवजांचे वाचन, त्यांच्या टिपणी काढणे व अनुसूची तयार करणे, ही कामे केली पाहिजे. तसेच कामाच्या ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी छंद जोपासायला हवा आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून प्रशासनात वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची पिढी ही ‘टेक्नोसॅव्ही’ असून प्रत्येकाने तंत्रज्ञानाची नवनवी साधने वापरून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी याचा वापर केल्यास आपली प्रतिमा उजळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनी सर्वोत्कृष्ट सेवा द्यावी
By admin | Published: May 17, 2015 2:59 AM