लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ७ डिसेंबरपासून नागपुरात नियोजित असलेल्या हिवाळी अधिवेशनाबाबत अद्यापही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच २५ नोव्हेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज नागपुरात सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई व नागपुरातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली असून शासनाच्या निर्देशांकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याची घोषणा अगोदरच झालेली आहे. परंतु कोरोनाची पार्श्वभूमी व इतर कारणांमुळे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काही अधिकाऱ्यांनी २० डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र असे झाले तर केवळ काही दिवस अधिवेशन चालेल. अशा स्थितीत कोट्यवधींचा खर्च करणे कितपत योग्य ठरेल यावरदेखील शासन-प्रशासनात मंथन सुरू आहे.
एकूण संभ्रम लक्षात घेता विधीमंडळ सचिवालयातील अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे ठरविले आहे. नागपुरातील अधिकाऱ्यांनादेखील तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशन कधी व कुठे होणार याबाबत विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनादेखील नेमकी माहिती नाही. राज्य शासनाचे निर्देश अद्याप आलेले नाहीत. शासनाकडून निर्णय झाल्यावर त्याचे पालन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अद्याप तयारीला सुरुवातही नाही
७ डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला तर प्रशासनाची प्रचंड धावपळ होईल. आमदार निवास, रविभवन, नागभवन, देवगिरी, रामगिरी यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तयारीची कुठलीही कामे सुरू नाहीत. जर अधिवेशन २० डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन झाले तरीदेखील तयारीसाठी २७ दिवसांचाच कालावधी मिळेल. अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरूपातील पदभरतीसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे हे विशेष.