लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये बार आणि वाईन शॉपची दुकाने बंद ठेवून परवानाधारकाला ऑनलाईन मद्य डिलिव्हरीची मुभा राज्य शासनाने दिली आहे. पण बार आणि वाईन शॉपचालक ऑनलाईन डिलिव्हरीऐवजी ग्राहकांना दुकानाबाहेरच मद्याची विक्री करीत असल्याचे नागपुरात चित्र आहे. संकटकाळातही मद्य विक्रेते दुप्पट भावात मद्याची विक्री करून लोकांची लूट करीत आहे. याकडे राज्य अबकारी विभागाचे दुर्लक्ष असून आर्थिक व्यवहारामुळे सव प्रकार खुलेआम घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
रविवारी सकाळी नंदनवन, गणेशनगर तिरंगा चौक आणि सक्करदरा, त्रिमूर्तीनगर, सुरेंद्रनगर भागातील मद्य दुकानांची पाहणी केली केली. ऑनलाईन डिलिव्हरीसाठी अनेक मद्य विक्रेत्यांच्या दुकानांचे शटर थोडे खुले होते. दुकानाजवळच मद्यपींची खरेदीसाठी गर्दी होती. केवळ मोबाईलद्वारे लोकांना मद्य पोहोचते करण्यात येत होते. अशा अवैध विक्रीमुळे लगतच्या रहिवासी भागातील नागरिकांना त्रास होत आहे. मद्याचा परवाना असलेल्यांनाच मद्य विक्रीची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. पण शासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून मद्य विक्रेते परवाना नसलेल्यांनाही खुल्यावर विक्री करीत आहेत. सुरेंद्रनगरात तर पेट्रोलपंपामागील उद्यानाजवळ जत्राच भरलेली असते.
नंदनवन भागात बार आणि वाईन शॉप समोरासमोर आहेत. रविवारी सकाळीपासून जवळपास ५० जणांची मद्य खरेदीसाठी गर्दी होती. दुकानातून मद्य काढून डिलिव्हरी बॉय बाजूला ग्राहकांना देत होता. त्याला विचारणा केली असता, तक्रार करायची असेल तर करा, आमचे काहीही बिघडत नाही. मालक सगळे पाहून घेईल, असे उत्तर डिलिव्हरी बॉयने दिले. यावरून अबकारी विभागाच्या क्षेत्रीय निरीक्षकांची मद्य विक्रीला अप्रत्यक्ष परवानगी असल्याचे स्पष्ट होते.
गेल्या आठवड्यात गणेशनगर, तिरंगा चौकातील एका बारची तक्रार लगतच्या नागरिकांनी कोतवाली पोलिसांकडे केली होती. बारच्या बाजूच्या गल्ली लोक मद्य खरेदीसाठी उभे राहत होते. त्यांना बारचा डिलिव्हरी बॉय मद्य पोहोचवित होता. लोकांच्या दररोजच्या गर्दीने नागरिक त्रस्त होते. अखेर पोलिसांनी मद्य विक्रेता आणि ग्राहकांवर कारवाई केली होती. नागपुरात अशाप्रकारे मद्य विक्री सुरू असून विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.