नागपूर : कुरिअर कंपनीच्या कार्टनध्ये कोबरा साप निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे न्यू ज्ञानेश्वरनगरात खळबळ उडाली होती.
सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखेटे पत्नीसोबत राहतात. त्यांची मुलगी बंगळूरमध्ये काम करते. दीड वर्षापूर्वी वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे ती नागपुरात आली. तिने आपले सामान आपल्या सहकारी मैत्रिणीकडे ठेवले होते. वर्क फ्रॉम होम संपण्याची शक्यता कमी असल्यामुळे लखेटे यांच्या मुलीने आपल्या मैत्रिणीला सामान कुरिअरने पाठविण्यास सांगितले. तिच्या मैत्रिणीने सात ते आठ कार्टन तसेच कंटेनरमध्ये सामान नागपूरला पाठविले.
तीन दिवसांपूर्वी वाडी येथील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे सामान पोहोचले. सोमवारी सामानाची डिलिव्हरी लखेटे यांना देण्यात आली. रात्री ९ वाजता लखेटे दाम्पत्य आणि त्यांची मुलगी कार्टन उघडून सामान काढत होते. त्यांनी चौथे कार्टन उघडताच त्यात साप दिसला. लखेटे दाम्पत्य आणि त्यांची मुलगी घाबरून पळून गेल्या. त्यांचा आवाज ऐकून शेजारीही गोळा झाले. लखेटे दाम्पत्याने लाकडाच्या मदतीने कार्टनला घराच्या बाहेर आणले. त्यांनी कार्टन उलटे करताच त्यातून पाच फुटांचा साप बाहेर आला.
परिसरातील एका सर्पमित्राने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. सापाने फूत्कारल्यामुळे सर्पमित्राची पावलेही थांबली. दरम्यान, साप झपाट्याने निघून गेला. सर्पमित्राने हा साप कोबरा जातीचा असल्याचे सांगितले. कार्टनमध्ये एक छिद्र होते. त्यातून हा साप कार्टनमध्ये गेला असावा असा अंदाज आहे. सर्पमित्रांच्या मते साप छिद्र करीत नाही. अशा स्थितीत कशामुळे हे छिद्र पडले असावे हे सांगणे शक्य नाही. या घटनेमुळे लखेटे कुटुंबीय हादरले आहेत. परंतु सापाने कोणालाच चावा न घेतल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कोबरा हा प्रचंड विषारी साप असतो. त्याने चावा घेतल्यास जीवही जाऊ शकतो.
................