लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अदृष्यशक्ती हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. त्याला कोणी भूत, कोणी आत्मा, तर कुणी पारलौकीक शक्तीचे बिरूद लावतात. हिच बिरूदे नंतर असंतुष्टी आणि कुणाचे तरी वाईट चिंतण्यावर लादली जातात आणि तेव्हा भानामतीचे खेळ सुरू होतात. सामान्य माणूस भयापोटी अंधश्रद्धेने ग्रासतो आणि मग सुरू होतो मांत्रिक - तांत्रिकांचा बोगस खेळ. असाच खेळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडकीस आणला आहे.
वाठोडा, भांडेवाडी परिसरात एका १४ सदस्यांच्या कुटुंबाला अनेक दिवसांपासून विचित्र गोष्टींचा साक्षात्कार होत होता. अचानक लिंबू येणे. त्यावर कुंकू, बुक्का, एक रुपयाचा शिक्का दिसणे, तांदळाच्या रांगोळीत लिंबू सजवून ठेवलेला दिसणे, देव्हाऱ्यातील मूर्ती अचानक सोफ्यावर येणे, बादलीतील पाणी लाल - पिवळे - काळे होणे, केसांची बाहुली पिण्याच्या पाण्यात येऊन पडणे, आपोआप दिवे पेटणे या अशा रहस्यमय घटना सातत्याने घडत असल्याने हे कुटुंब प्रचंड घाबरले होते. हा भानामतीचा प्रकार असल्याचे कुणीतरी त्यांना सांगितल्याने, स्वाभाविकच कुटुंब दहशतीत आले. हे उपद्व्याप रोखण्यासाठी त्यांनी तीन वेगवेगळ्या मांत्रिकांना बोलावले. मंत्रतंत्र विधी, जारणमारण करून त्यांनी घर बांधले असल्याचे सांगून या कुटुंबाकडून तीन हजार रुपये घेतले आणि निघून गेले. अतृप्त आत्मे फिरत आहेत, अशी भीती त्यांनी दाखवली होती. मात्र, मांत्रिक गेल्यावर आणि घर बांधले असल्याचे सांगूनही हे उपद्रव काही थांबले नाहीत. अखेर त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. विधिवत अर्ज आणि इतर सोपस्कार पार झाल्यावर हे पथक घटनास्थळी पोहोचले. काही नियम सांगून त्यांनी एकापाठोपाठ कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे इंटरोगेशन केले. यातून त्यांना हा कुटुंबातीलच असंतुष्टीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आणि भानामतीच्या उपद्रवावर पडदा पडला. त्यानंतर काही प्रयोगाद्वारे कुटुंबीयांच्या मनातील भीती दूर करण्यात आली. त्यानंतर मात्र कोणतेच भयाक्रांत चमत्कार घडले नाहीत. यावेळी समितीचे हरिश देशमुख, सुरेश झुरमुरे, छाया सावरकर, सुनील वंजारी, श्रावण खुदरे, सुरेंद्र वानखेडे हे उपस्थित होते.
-----------
भानामती हा प्रकार चमत्कारिक असल्याने, अनेक जण भुताखेताचा प्रकार म्हणून दहशतीत येतात. मात्र, हा प्रकार असंतुष्ट व्यक्ती आपले लक्ष वेधण्यासाठी, आपल्या अतृप्त भावना व्यक्त करण्यासाठी करत असतात. रोजच्या घडामोडीत अचानक विचित्र घडणाऱ्या घटनांमुळे आपण त्याना जादुटोण्याचा किंवा भानामतीचा प्रकार म्हणून ओळखतो. मात्र, हे कुणीतरी स्वत:च नजर फिरवून करत असतात.
- हरिश देशमुख, महासचिव, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती
.................