नागपूर : स्वत:च्या पत्नीचीच हातोड्याने वार करून हत्या केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. प्रेमविवाह केल्यानंतर पार्टनरचा जीव घेणे किंवा प्रेमातून आत्महत्या करणे हे प्रकार मागील काही काळात बघायला मिळाले आहेत. मात्र आयुष्य हे सुंदर असल्याची कल्पना असूनही ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा स्वत:चे आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रेम हे प्रेम असते, सर्वांचे सेम नसते असे म्हणतात. मात्र प्रेमाची भावना सारखीच असते. प्रेमात अनेकजण आंधळे होतात. परंतु ज्याच्यावर प्रेम केले, त्याचा शुल्लक वादातून जीव घेण्यासाठीदेखील लोक मागे-पुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. कसलाही संबंध नसताना जीव गेल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तसेच प्रेमातून आत्महत्या करण्याच्या घटनादेखील दिसून आल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी शहर पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यास, पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत त्यांच्यात होणार आहे. यासाठी पोलिसांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
पत्नीशी वाद, स्वत:सह मुलांनाही संपविले
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीशी झालेल्या वादानंतर मुलांचा जीव घेत आत्महत्या केल्याने शहर हादरले होते. वैष्णोदेवी नगर येथे मनोज अशोक बेले (४५) याचे त्याची पत्नी प्रियासोबत सातत्याने वाद व्हायचे व त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहायचे. त्याने सातवर्षीय तनिष्का व बारावर्षीय प्रिन्स यांना खाऊमधून विष देऊन मारले व स्वत: आत्महत्या केली होती.
‘एक दुजे के लिए’ म्हणत आत्महत्या
सप्टेंबर महिन्यात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीने चक्क रेल्वेगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली होती. त्यांना लग्न करावयाचे होते. मात्र, नातं आड येत असल्याने समाज आपल्याला स्वीकारणार नाही, याची जाणीव दोघांनाही असल्याने त्यांनी सोबत जीव देण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. जितेंद्र काशिराम नेवारे (३५, रा. बाबा फरीदनगर, मानकापूर, नागपूर) व स्वाती पप्पू बोपचे (१९, रा. तुमखेडा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) अशी मृतांची नावे होती.