आॅनलाईन लोकमतनागपूर : सहा वर्षीय मुलाने गिळलेले पाच रुपयांचे नाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एन्डोस्कोपीच्या मदतीने बाहेर काढले. तब्बल चार महिने हे नाणे त्या मुलाच्या पोटात होते. मुलगा गतिमंद असल्याने त्याला सांगता येत नव्हते. अखेर दुखणे असह्य झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर पोटात नाणे असल्याची बाब स्पष्ट झाली.शेख अरबाज शेख (६) रा. जिल्हा अमरावती, तहसील अचलपूर भोगाव येथील तो रहिवासी आहे.चार महिन्यांपूर्वी अरबाज घरी खेळत होता. तोंडात ठेवलेले पाच रुपयांचे नाणे कधी पोटात गेले हे त्याला कळले नाही. गतिमंद असल्याने त्याला हा प्रकार आई-वडिलांनाही सांगता आला नाही. पोटात नाणे असल्याने त्याचे पोट दुखत होते, उलट्या होत होत्या, परंतु उपचार होत नव्हते. चार महिने निघून गेल्यानंतर मागील आठवड्यात पोटाचे दुखणे वाढले. त्याचे वडील शेख रज्जाक शेख इसम हे अरबाजला अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यावर नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. शुक्रवारी ‘सुपर’च्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात आल्यावर विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी त्याला तपासले. एक्स-रे केल्यानंतर पोटात नाणे असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी ‘एन्डोस्कोपी बास्केट’च्या मदतीने ते बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु चार महिने पोटात नाणे होते. यामुळे ते कशा अवस्थेत असेल व बाहेर काढताना कुठलाही धोका होण्याची चिंता होती. तरीही अनुभव कौशल्याच्या बळावर डॉ. गुप्ता यांनी अवघ्या दहा मिनिटांत नाणे बाहेर काढले. गेल्या चार महिन्यांपासून असलेल्या पोटदुखीच्या त्रासापासून शेख अरबाजला मुक्ती मिळाली. मंगळवारी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याचा आनंद पाहता गरीब आई-वडिलांच्या जीवात जीव आला.डॉ. गुप्ता यांच्या मदतीला डॉ. अमोल समर्थ, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. तुषार संकलेचा, डॉ. हरित कोठारी, परिचारिका व अटेन्डंट चमू होती. अरबाजला मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.
अबब! गिळलेले नाणे काढले चार महिन्यानंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 8:03 PM
सहा वर्षीय मुलाने गिळलेले पाच रुपयांचे नाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एन्डोस्कोपीच्या मदतीने बाहेर काढले. तब्बल चार महिने हे नाणे त्या मुलाच्या पोटात होते.
ठळक मुद्देनागपूरच्या ‘सुपर’मध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रियासहा वर्षीय गतिमंद मुलाने गिळले होते नाणे