लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्यांनी कोणती ॲप डाऊनलोड केले नाही. कुणाला डेबिट कार्ड अथवा बँक खात्याविषयी माहिती दिली नाही किंवा कुणाला ओटीपी नंबरही नाही सांगितला. तरीसुद्धा एका महिलेच्या बँक खात्यातून सव्वातीन लाख रुपये गायब झाले. ५ ते २८ जून २०२० दरम्यान झालेल्या या जादूच्या प्रयोगामुळे हुडकेश्वर ताजेश्वरनगरातील लता अनिलकुमार रंगवार (वय ४०) या चक्रावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी लता त्यांचे कार्ड घेऊन एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. पुरेशी शिल्लक नसल्याने रक्कम काढता येणार नाही, असे मेसेज त्यांना येऊ लागले. त्यामुळे त्या त्यांच्या बँकेत गेल्या. तेथून त्यांनी स्टेटमेंट काढले असता, उपरोक्त कालावधीत त्यांच्या खात्यातून अज्ञात आरोपीने ३ लाख २० हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांना कळले. बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड सुरक्षित असताना आणि कुणासोबत कसलाच व्यवहार झाला नसताना एवढी मोठी रक्कम कुणी गायब केली, असा प्रश्न आहे. यासंबंधाने बँक अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहे. त्यामुळे लता यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.