मोरेश्वर मानापुरे, नागपूर : अनेक दिवसांपासून खाद्यान्न, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थ महागल्याने किचनचे बजेट पार कोलमडून गेले आहे. पण, कोलडमडेल्या किचन बजेटला खाद्यतेलाच्या घसरत्या किमतीचा थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत प्रतिकिलो ५ ते ६ रुपयांची घसरण झाली असून सर्वाधिक विक्रीच्या सोयाबीन तेलाचे भाव १०९ रुपये किलो अर्थात तीन वर्षांआधीच्या स्तरावर आले आहे.
म्हणून घटले खाद्यतेलाचे दर- केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्यावर आणले. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाची आयात वाढली. यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया, इंडोनिशियात पाम, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिनामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच खाद्यतेलाचे दर घसरले आहेत.
पावसाळ्यात तेलकट खाणे टाळा- समोसे, पकोडे आणि तळलेले स्नॅक्स पावसाळ्याच्या दिवसात मोहक असतात, पण पोटाला जड होऊन अपचन होऊ शकतात. तेलकट आणि तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढणे आणि पचनास त्रास होऊ शकतो. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज आणि पनीर जास्त आर्द्रतेमध्ये लवकर खराब होऊ शकतात. दूषित दुग्धजन्य पदार्थांमुळे अन्न विषबाधा होऊ शकते.
तेलाचे भाव घसरले (प्रति किलो)
तेल १५ दिवसांआधी सध्या भाव
- सोयाबीन ११५ १०९
- पामतेल ११२ १०७
- सूर्यफूल १२४ ११९
- राइस ब्रान १२० ११५
- जवस १२४ ११९
- मोहरी १४० १३५
- शेंगदाणा तेल १७५ १७५
लग्नकार्य नाही, दर घसरले
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहे. शाळा सुरू झाल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत लग्नकार्य नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. पुढे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.अनिल अग्रवाल, खाद्यतेल व्यापारी.