मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यान्न, कांदे, पेट्रोल, डिझेल पाठोपाठ खाद्यतेलाचे भाव भडकल्यामुळे गरीब, सर्वसामान्यांना महागाईचेही चटके बसत आहेत. खाद्यतेलाच्या भावात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. किरकोळमध्ये सोयाबीन तेल १०४ रुपये आणि शेंगदाणा तेल १२८ रुपये किलोवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा तडका महागल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे.
हॉटेल्सचा सोयाबीन तेलाच्या खरेदीवर भरदिवाळीपासून ठोक बाजारात सोयाबीन तेलाचे भाव १५ किलोमागे २१० रुपयांनी वाढून १५०० ते १५२० रुपयांवर पोहोचले आहेत. दहा दिवसात तब्बल १०० रुपयांची वाढ झाली आहे.किरकोळमध्ये जवळपास १४ ते १५ रुपयांची वाढ होऊन भाव प्रति किलो १०४ रुपये झाले आहेत. पाम तेल १५ किलोमागे तब्बल ३४० रुपयांनी वाढून १३६० ते १३८० रुपये तर किरकोळमध्ये प्रति किलो २२ ते २३ रुपयांची वाढ होऊन भाव १०० रुपयांवर पोहोचले आहे. दोन्ही तेलाच्या भावात जास्त फरक नसल्यामुळे पूर्वी पाम तेलाची खरेदी करणाऱ्या हॉटेल्स संचालकांनी आता सोयाबीन तेलाची खरेदी वाढविली आहे. त्याचा भाववाढीला हातभार लागत आहे. भाव दरदिवशी वाढतच आहेत.नागपूर जिल्ह्यात दरदिवशी १५ ते १६ हजार डब्यांची (प्रति डबा १५ किलो) विक्री होते. त्यात ८ ते १० हजार सोयाबीन आणि ३ ते ४ हजार पाम तेलाच्या डब्यांची विक्री होते. या तेलाचे खरेदीदार गरीब आणि सामान्य आहे. भाववाढीचा सर्वाधिक फटका गरीब आणि सामान्यांनाच बसत आहे. केंद्र सरकारने कच्च्या सोयाबीनचे आयात शुल्क कमी केले तरच भाव कमी होतील, असे मत इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
मलेशियात पाम तेलापासून बायोडिझेलची निर्मिती बंधनकारकभारतात कच्च्या पाम तेलाची आयात मलेशिया आणि इंडोनेशिया देशातून होते. मलेशियात एकूण उत्पादनापैकी ३० टक्के पाम तेलापासून बायोडिंझेलची निर्मिती बंधनकारक केली आहे. त्यामुळे ७० टक्केच पाम तेल भारतात आयात होत आहे. आयातीवर ३५ टक्के शुल्क आहे. त्याचाही फटका पाम तेलाच्या भाववाढीला बसला आहे. त्यामुळे या तेलाचे भाव किरकोळमध्ये १०० रुपयांवर पोहोचले आहेत. केंद्राने आयात शुल्क कमी केल्यास आयात वाढून पाम तेलाचे भाव कमी होतील. त्याचा परिणाम सोयाबीन तेलाच्या घसरणीवर निश्चितच होणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
देशात जवस, सरकी व सरसो खाद्यतेलाचा प्रचार व्हावाकांद्याच्या भाववाढीवर निरंतर प्रतिक्रिया देणारे राजकीय नेते महिन्यात सोयाबीन खाद्यतेलाचे भाव १५ रुपये किलोने वाढल्यानंतर चर्चा करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणायचे असल्यास देशात जवस, सरकी आणि सरसो तेलाचा प्रचार करावा. शासकीय स्तरावरून चर्चा करून अन्न व औषध प्रशासन विभागाने लहान जवस खाद्यतेल विक्रेत्यांवर धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे मधल्या काळात जवस तेल बाजारातून गायब झाले होते. जवस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.- ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.
सोयाबीनची आवक मंदावली
सोयाबीन आणि पाम तेलाच्या भाववाढीची तीन कारणे आहेत. यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे ५० टक्के पीक खराब झाले आहे. कळमन्यात दरवर्षी दिवाळीपासून तीन महिन्यांपर्यंत दररोज होणारी २५ ते ३० हजार पोत्यांची आवक यंदा ५ हजारांपर्यंत घसरली आहे. याशिवाय तेल उत्पादक कंपन्यांना सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे. जास्त भावात सोयाबीन खरेदी करून क्रशिंग करणे कठीण जात आहे. अर्जेंटिना देशाने कच्च्या सोयाबीनचे निर्यात शुल्क २५ वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे.शिवाय भारतात आयात शुल्क जास्त असल्यामुळे विदेशातून कच्चे सोयाबीन तेल मागविणे महाग झाले असून, रुपयांच्या अवमूल्यनाचा आयातीवर परिणाम झाला आहे. ही सर्व कारणे सोयाबीन तेलाच्या भाववाढीसाठी कारणाभूत ठरली आहेत. देशात सोयाबीनची उपलब्धता कमीच आहे.