आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.सदस्य सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या नियम ९७ वरील चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकाºयांना कडक सूचना दिल्या जातील असेही ते म्हणाले.ओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ४,१०० रुपये, नष्ट झालेल्या बोटींसाठी ९,६०० रुपये, अंशत: नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी २,१०० रुपये तर पूर्ण नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी २,६०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६,८०० रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३,५०० तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजारांची मदत देण्याची घोषणा पाटील यांनी केली. घोषित केलेली नुकसानभरपाईची मदत केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून (एनडीआरएफ) निधी येईपर्यंत वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून ही मदत तात्काळ देण्यात येणार आहे.वादळापूर्वी समुद्र किनाऱ्यावर धोक्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही समुद्रात गेलेल्या सर्व २,६०६ बोटींना संदेशयंत्रणा राबवून समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. केरळ, तामिळनाडू, गोवा तसेच कर्नाटक राज्यातील ३८९ बोटी भरकटून आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आल्या होत्या. त्यावरील २,८८५ खलाशांची निवासाची, बोटींना डिझेल देण्याची व्यवस्था राज्य शासनाने केल्याची माहिती पाटील यांनी दिली. सुनील तटकरे यांनी नुकसानग्रस्तांना सरसकट मदतीची मागणी केली. चर्चेत भाई गिरकर, जयंत पाटील,हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.