ऑनलाईन नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाच्या व महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांगांनी यापूर्वी केलेले व निर्णय न झालेले सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत. आता त्यांना योजनांचा लाभ घ्यावयाचा असल्यास ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाईन नोंदणीला सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला.
यामुळे पारदर्शकता वाढणार असून अखेरच्या घटकाला योजनांचा लाभ मिळेल. त्यामुळे शहरातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, छत्रपती, द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर उपस्थित होते.
योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. दिव्यांगाला याची माहिती होण्यासाठी समाजविकास विभागाने जनजागृती करावी. झोनमध्ये फॉर्म भरण्यासाठी मुभा देण्यात यावी. तसेच महा ई-पोर्टलच्या माध्यमातून त्यांना ही सुविधा प्रदान करावी. नोंदणीमध्ये अडचण येत असेल त्यांनी समुदाय संघटकांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
शासन व मनपाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन राधाकृष्णन बी यांने केले. यावेळी १० दिव्यांगांना योजनेंतर्गत इलेक्ट्रिक ट्रायसिकल प्रदान करण्यात आल्या.
...
अशी करा नोंदणी
मनपाच्या https://www.nmcnagpur.gov.in लिंक वर क्लीक करून स्वत:चा मोबाईल नंबर टाकून ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी टाकल्यानंतर अर्जदाराने नोंदणी करावी. पंजीकरण करताना दिव्यांगांचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कलिस्ट, रेशनकार्ड, फोटो, मतदान कार्ड संलग्न करावयाचे आहे.
.......