प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात २०१९ साली सत्तांतर झाल्यापासून राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन समितीची नेमणूकच झाली नसल्याने शासनामार्फत मिळणाऱ्या मानधनाच्या लाभापासून अपेक्षित वृद्ध कलावंतांना वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्याचा पालक या नात्याने होणाऱ्या विकासकामांसोबतच नागरिकांच्या समस्या निस्तारण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. मात्र, पालकमंत्र्यांच्या पालकत्वात वृद्ध कलावंत येत नाहीत का की पालकमंत्र्यांना वृद्ध कलावंतांचा तिरस्कार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील ५० वर्षांवरील वृद्ध कलावंतांना दर महिन्यात अ, ब, क श्रेणीनुसार मानधनाचे वाटप करण्यात येते. सद्य:स्थितीत राज्यात साधारणत: २८ हजार वृद्ध कलावंत या मानधनाच्या कक्षेत येतात. मानधनापोटी दर महिन्यात ७ कोटी रुपये निधीचे वाटप केले जाते. वृद्ध कलावंतांची निवड करण्याची जबाबदारी वृद्ध कलावंत मानधन समितीकडे असते. २००८ सालापासून ही समिती अस्तित्वात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या रचनेप्रमाणे मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांत जिल्हास्तरीय वृद्ध कलावंत मानधन समिती गठित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे असते. मात्र, २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यापासून नागपूरसह काही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी समिती गठित करण्यात रस दाखवलेला नसल्याचे दिसून येते. सांस्कृतिक संचालनालयाच्या नोंदीनुसार आतापर्यंत राज्यातील १३-१४ समित्यांचीच नोंद झाली आहे. यावरून, ज्येष्ठ नागरिकांबाबत राज्यातील पालकमंत्री उदासीन असल्याचेच स्पष्ट होत आहे.
दरवर्षी १०० नव्या कलावंतांची नोंद
मानधनासाठी प्रत्येक जिल्ह्यातून नव्या वृद्ध १०० कलावंतांची निवड करण्याचा अधिकार जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीला आहे. पूर्वी ६० कलावंतांचीच निवड होत असे. मात्र, विदर्भ शाहिर कलावंत परिषदेच्या पाठपुराव्यानंतर ही संख्या शंभर करण्यात आली. राज्यात ३६ जिल्हे आहेत आणि अशा तऱ्हेने मानधनासाठी दरवर्षी ३६०० नव्या वृद्ध कलावंतांची नोंद शासनदरबारी होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या समितीची नेमणूकच झाली नसल्याने विदर्भातील जवळपास २२०० नवे वृद्ध कलावंतांसह राज्यातील हजारो नवे वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित राहिले आहेत.
- अरुण वाहणे, विदर्भ शाहीर कलावंत परिषद, नागपूर जिल्हा
समितीकडून आलेल्या नावांची नोंद होते
आतापर्यंत १३-१४ जिल्हा वृद्ध कलावंत समितीची नियुक्ती झाली आहे. या समित्यांनी वृद्ध कलावंतांची नावे दिली की, त्याची नोंद मानधनासाठी केली जाते. इतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी समिती नेमल्यावर संबंधित जिल्ह्याच्या वृद्ध कलावंतांची यादी आमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांचीही नोंद केली जाईल.
- बिभीषण चावरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
................