---
जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
नागपूर - पतीच्या दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या भारती महादेवराव धार्मिक (वय ४६) यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारती आणि त्यांचे पती महादेवराव धार्मिक (वय ५०, रा. कामठी मार्ग, नाका नंबर ४ जवळ) हे दोघे १९ ऑगस्टच्या सकाळी १० वाजता दुचाकीने कामावर जात होते. कळमन्यातील शिवशक्ती बार जवळ वेगात ट्रक येताना दिसल्याने धार्मिक यांनी ब्रेक मारला. त्यामुळे दुचाकी स्लीप झाली आणि खाली पडून भारती गंभीर जखमी झाल्या. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना २० ऑगस्टच्या सायंकाळी भारती यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे कळमना पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----