लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) तयार करण्यात आले. मात्र, गुरुवारी आमदार निवासातील ‘सीसीसी’मध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. धक्कादायक म्हणजे रुग्णाची कोविडची चाचणीच झाली नसतानाही रुग्णाला ‘सीसीसी’मध्ये पाठविण्यात आले होते.कोरोनाबाधित ८५ ते ९० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाही. अशा रुग्णांची मेयो, मेडिकलमध्ये तपासणी करून होम आयसोलेशन केले जाते. घरी सोय नसल्यास रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाते. जिल्ह्यात असे १८ सेंटर आहेत. यातील ६ शहरात तर १२ ग्रामीणमध्ये आहेत. येथे २४ तास डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास मेयो, मेडिकलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकाही दिली आहे.प्राप्त माहितीनुसार, वाडी येथील या ६५ वर्षीय मृताचा मुलगा ४ आॅगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला. मुलाला आमदार निवासातील ‘सीसीसी’मध्ये पाठविण्यात आले. बुधवारी या मुलाच्या वडिलांना ताप आला. तपासणीसठी वाडी येथील प्राथमिक उपकेंद्रात गेले असता कोविडची तपासणी न करताच त्यांना आमदार निवासात पाठविले. गुरुवारी सकाळी तेथील डॉक्टरांची चमू राऊंड घेत असताना खाटेवरच या वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती वरिष्ठांना देताच मनपाचे अनेक मोठे अधिकारी यांनी आमदार निवासाला भेट देऊन चौकशी केली. कोविड चाचणीसाठी मृतदेहाला मेडिकलमध्ये पाठविण्यात आले.रुग्णाची प्रकृती गंभीर असताना मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याऐवजी सीसीसीमध्ये पाठविलेच कसे, या प्रकरणाला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांना मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
कोविड केअर सेंटरमध्ये वृद्धाचा मृत्यू : आमदार निवासातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 8:10 PM
कोविड पॉझिटिव्ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) तयार करण्यात आले. मात्र, गुरुवारी आमदार निवासातील ‘सीसीसी’मध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ठळक मुद्देकोविडची चाचणी न करताच पाठविले सीसीसीमध्ये