नागपूर : आधीही विविध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत या कारणामुळे आरोपीला नवीन गुन्ह्यामध्ये जामीन नाकारला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट करून खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. (Old offenses cannot deny bail in a new offense; High Court)
पवन नंदकिशोर सेदानी असे आरोपीचे नाव असून, तो आकोट, जि. अकोला येथील रहिवासी आहे. मृताचे नाव तुषार पुंडकर होते. तो सेदानीच्या चुलत भावाच्या खुनात सहभागी होता. त्यामुळे सेदानीने सूड घेण्यासाठी अन्य आरोपींसोबत मिळून पुंडकरचा बंदुकीच्या गोळ्या झाडून खून केला, असे सरकारचे म्हणणे आहे. ही घटना २१ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री घडली होती.
सेदानीने या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सरकारने सेदानीविरुद्ध आधीही दोन गुन्हे नाेंदविण्यात आले असल्याची माहिती देऊन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने ही कायदेशीर बाब स्पष्ट केली व या प्रकरणात ठोस पुरावे नसल्यामुळे सेदानीचा अर्ज मंजूर केला. सेदानीतर्फे वरिष्ठ ॲड. सुबोध धर्माधिकारी व ॲड. कार्तिक शुकुल यांनी बाजू मांडली.