अर्थसंकल्पापूर्वी जुनी पेन्शन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
By मंगेश व्यवहारे | Published: December 14, 2023 12:52 PM2023-12-14T12:52:07+5:302023-12-14T12:52:53+5:30
सहाय समितीचा अहवाल आला आहे. या अहवालाचे सरकारने वाचन केलेले नाही
नागपूर : जुनी पेन्शनसंदर्भात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव होते. मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शनबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
सहाय समितीचा अहवाल आला आहे. या अहवालाचे सरकारने वाचन केलेले नाही. त्यानंतर अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कर्मचारी संघटनांशी चर्चा करतील. केंद्र सरकारनेदेखील एक अभ्यास समिती गठीत केली आहे. पण, त्यांच्याशी आम्ही लिंकअप करणार नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, यासाठी सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. २०३१-३२ पासून जुनी पेन्शनची अंमलबजावणी होणार आहे. त्यांचे काही मुख्यमंत्र्यांनी निकाली काढले. कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. मात्र, आम्ही संप मागे घेण्याचे आवाहन केले असून चर्चेतून यावर तोडगा निघेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. याप्रसंगी त्यांनी पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, काही संशोधक नेत्यांवर पीएचडी करताहेत, असे होऊ नये. पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कांदा, इथेनॉलप्रश्नी अमित शहांना भेटणार
दूध, कांदा आणि इथेनॉल प्रश्नावर आम्ही काल सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोललो. दुधाची पावडर निर्यात करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा देशभरातील दुध उत्पादकांना मदत होईल, असे सांगितले. तर कांदा आणि इथेनॉलबाबत १६ला आम्ही भेट घेणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.
भुजबळांचा गैरसमज दूर करणार
महाज्योतीला सारथीच्या तुलनेत कमी अनुदान मिळाल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले,‘कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये सारथी, बार्टी, महाज्योती यांना मोठी तरतूद केली आहे. ती मंजूर पण झाली आहे. राज्यकर्ते कुणीही असले तरी असा भेदभाव करता येत नाही. भुजबळांना काही गैरसमज झाला असल्यास त्यांच्याशी बोलून तो दूर करण्यात येईल. तसेच, त्यांचे म्हणणे बरोबर असल्यास तशी दुरुस्ती करण्यात येईल.’
त्यांचे त्यांना विचारा
नाना, काका, बाबा, अण्णा, बापू कोण काय बोलतात ते मला विचारू नका. ते विरोधीपक्षाचे नेते आहेत, त्यांना बोलावेच लागेल. ते सरकार चांगले काम करतेय असे म्हणणार आहे का, असा असा टोला अजित पवारांनी लगावला.