लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: ऑलिम्पिक सुरू झाले आहे. या ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडू अशाही आहेत ज्या आई बनल्यानंतरही खेळात कायम राहिल्या. दमदार कामगिरीच्या बळावर ऑलिम्पिकची पात्रतादेखील गाठली. यात भारताच्या दोन महिला खेळाडूंचादेखील समावेश आहे.
एलिसन फेलिक्स
अमेरिकेची ३५ वर्षांची ॲथ्लीट एलिसन फेलिक्स हिने २०१८ ला मुलीला जन्म दिला. वर्षभरानंतर मैदानावर पुनरागमन केले. २०१९ च्या दोहा विश्व स्पर्धेत सुवर्ण जिंकून ती पाचव्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे.
एम. सी. मेरीकोम
सहा वेळीची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम दुसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळत आहे. पदकाची दावेदार मानली जाणारी मेरीकोम चार मुलांची आई आहे. त्यातील दोन मुले जुळी. एका मुलाला २०१३ ला जन्म दिला. २०१८ ला मेरीकोमने मुलगी दत्तक घेतली.
शैली प्राईस
जमेकाची वेगवान धावपटू शैली फ्रेजर प्राईस हिने २०१७ ला मुलाला जन्म दिला. त्याआधी ती रियो ऑलिम्पिक खेळली होती. आता टोकियोसाठी सज्ज आहे. तिच्या नावे दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य अशा सहा पदकांची नोंद आहे.
ओकसाना चुसोविताना
उझबेकिस्तानची ही जिम्नॅस्ट ओकसाना चुसोविताना ४६ वर्षांची आहे. जवळपास तीन दशके ती मैदानात कायम असून या काळात तिने सोव्हिएत रशिया तसेच जर्मनीचे प्रतिनिधित्व केले. तिच्या नावावर दोन ऑलिम्पिक पदके असून ११ वेळा विश्वविजेती आहे. तिच्या एका मुलाचे नाव आहे, एलिशर.
सानिया मिर्झा
भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा ही मुलगा इजहानच्या जन्मानंतर पुन्हा कोर्टवर परतली. हैदराबादमध्ये वास्तव्य करणारी सानिया मुलाच्या जन्मासाठी दोन वर्षे कोर्टबाहेर होती. नंतर शानदार पुनरागमन करीत तिने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. अंकिता रैनासोबत दुहेरीत खेळलेल्या सानियाचे ऑलिम्पिक आव्हान रविवारी संपुष्टात आले होते.