नागपूरः कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती अनेक प्रश्न उपस्थित करतो. त्याला दिलेली लस कोरोना विषाणूविरुद्ध सर्वांत प्रभावी आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तो खूप उत्सुक असतो. लसीच्या दोन डोसनंतर आता ‘बूस्टर’ डोसबद्दलही अनेक जण उत्सुक आहेत.
-लसीकरणाचे सर्वांत लक्षणीय फायदे
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण साथीच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली आहे. लसीकरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे कोविड संसर्ग टाळता येतो. लसीकरण झालेल्या व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतरही गंभीर आजार होत नाही आणि त्यामुळे त्याला अधिक उपचारांची गरज पडत नाही. ऑक्सिजन थेरपी, व्हेंटिलेटर सपोर्टची गरज भासण्याची शक्यता कमी होते. परिणामी, मृत्यूचा धोकाही कमी होतो. लसीकरण झाल्यामुळे शरीरात विषाणूची गतीने वाढ होत नाही. त्याचे म्युटेशनही होत नाही. संक्रमित व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोकादेखील कमी होतो.
- भारतात सध्या कोणत्या लसीला परवानगी आहे
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोविशिल्ड, जेमेलिया इन्स्टिट्यूट मॉस्कोची स्पुतनिक व्ही यांना भारतात लसीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे.
-कोविशिल्ड म्हणजे काय?
ही मुळात ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची भारतीय आवृत्ती आहे. हे एडिनोव्हायरसच्या कमकुवत व्हर्जनपासून तयार करण्यात आले आहे. हा विषाणू मूळत: चिंपांझींकडून घेतलेला आहे आणि कोरोना विषाणूची प्रतिकृती बनवण्यासाठी त्यात बदल करण्यात आला आहे. लस शरीरात प्रवेश करताच अँटीबॉडीज तयार होऊ लागतात.
- कोव्हॅक्सिन म्हणजे काय?
ही भारतीय वंशाची पहिली अँटी-कोरोना व्हायरस लस आहे. हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केली आहे. त्यात मृत विषाणू आहे जो उत्परिवर्तन करू शकत नाही किंवा प्रतिकृती बनवू शकत नाही. ही देखील दोन डोसमध्ये दिली जाणारी लस आहे.
-स्पुतनिक व्ही म्हणजे काय?
यात ‘कोल्ड व्हायरस’ला वाहक (कॅरिअर) म्हणून तयार केले आहे. यात कोरोना विषाणूचे छोटे तुकडे शरीरात टोचले जातात. यामुळे ‘जेनेटेकली मोडिफाइड व्हायरस’च्या विरोधात शरीर अँटिबॉडीजसह प्रतिसाद देऊ लागते. ‘स्पुतनिक व्ही’ या लसीचा स्टोरेजसाठी २-८ अंश तापमान आवश्यक असते. या लसीला भारतात मान्यता प्राप्त आहे. लसीचे दोन वेगवेगळे डोस वेगवेगळ्या वेक्टर्सपासून बनविले जातात, जे व्हायरसच्या विशिष्ट स्पाइक्सला लक्ष्य करतात. यामुळे, हे व्हायरस म्युटेंटच्या विरोधातील युद्धात अधिक यशस्वी होते व चांगले संरक्षणही देते.
-कोरोना विषाणूचे कोणते दोन प्रकार विशेष चिंतेचे आहेत?
कोरोनाचा डेल्टा प्रकार हा दुप्पट संसर्गजन्य आणि गंभीर आजार होऊ शकतो. ज्यांनी लस घेतली नाही, अशा लोकांसाठी त्याचा सर्वांत मोठा धोका होऊ शकतो. लस घेतलेल्या लोकांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. एका संशोधनानुसार, डेल्टावर फायझर-बायोटेक, मॉडर्ना आणि जेन्सन/जॉनसन अँड जॉन्सनची लस कमी प्रभावी आहे. त्या तुलनेत भारतात उपलब्ध असलेल्या लसींमध्ये कोरोनाच्या गंभीर स्थितीपासून संरक्षण करण्याचे गुणधर्म आहेत.
- ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि लसीकरण?
डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग गतीने पसरतो. दोन लसी घेतलेल्या लोकांमधूनदेखील त्याचा प्रसार होऊ शकतो. मात्र, लसीकरणामुळे हा आजार गंभीर होण्याची शक्यता कमी होते. ओमायक्रॉन व्हेरिएंट काही मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचारांचा प्रभाव कमी करू शकतो.