- मोरेश्वर मानापुरेनागपूर - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याकरिता हजारो दुचाकी आणि चारचाकी वाहनांची बुकिंग झाली असून ग्राहक दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन घरी नेणार आहे. ग्राहकांचा उत्साह पाहता यंदा सर्वच शोरूममध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होणार आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहक आधीच बुकिंग केलेल्या दोन हजारांपेक्षा जास्त दुचाकी आणि ७०० हून अधिक चारचाकी घरी नेण्याची शक्यता आहे. नागपुरातील २५ पेक्षा जास्त ब्रॅण्डेड आणि नॉन ब्रॅण्डेड इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या विक्रेत्यांमध्येही प्रचंड उत्साह आहे. यंदा ईव्ही दुचाकी वाहनांवरील कर राज्य सरकारने रद्द केला तर केंद्र सरकारने कर अर्ध्यावर आणल्याने यंदा या वाहनांची नोंदणी कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्यावर्षी कर सवलतीमुळे ईव्ही वाहनांची विक्री जास्त झाली होती. नामांकित कंपन्यांच्या कारला मागणी आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदा नामांकित कंपन्यांचे सर्वच मॉडेल उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी चीपमुळे काही कारचे वेटिंग होते. त्यामुळे दसऱ्याला कार घरी नेण्याची इच्छा असलेल्या अनेकांची निराशा झाली होती. यंदा इव्ही कारच्या विक्रीत वाढ होणार असल्याचे डीलर्सनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचे एकूण वार्षिक विक्रीपैकी दसरा ते दिवाळीदरम्यान ४० टक्के विक्रीचे लक्ष्य असते. यंदाही कंपन्यांनी नवनवीन मॉडेल दाखल केले आहेत. अनेकांनी वस्तूंचे आधीच बुकिंग केले आहे. महागड्या वस्तूंना जास्त मागणी आहे. शुभदिनी वस्तू घरी नेणार असल्याचे श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत भांडारकर यांनी सांगितले.
फ्लॅट व प्लॉटचे बुकिंगक्रेडाई नागपूर मेट्रोचे पदाधिकारी म्हणाले, दसरा शुभदिनी गृह खरेदीला नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. फ्लॅट आणि प्लॉट खरेदीसाठी ग्राहकांची विविध प्रकल्पांमध्ये विचारणा होत आहे. या दिनी मोठ्या प्रमाणात नोंदणी होण्याची अपेक्षा आहे. यंदा गृहखरेदीत वाढ झाली असून ग्राहकांना ऑफर्सचा फायदा होत आहे.