नागपूर : उत्तर भारतीयांसाठी श्रद्धा आणि आस्थेचा सण माणला जाणारा छटपूजा महापर्व अवघ्या काही तासांवर आले आहे. त्यामुळे आपापल्या प्रांतात जाण्यासाठी उत्तर भारतीय मंडळींनी रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी केली आहे. मिळेल त्या गाडीत बसून आपल्या प्रांतात जाण्यासाठी त्यांची लगबग दिसून येत आहे.
चार दिवसांचे छट महापर्व १७ नोव्हेंबर पासून सुरू होणार असून, ते २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. पती आणि मुलांच्या दिर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जिवनासाठी आणि घरात सुख समृद्धी यावे म्हणून महिला हे व्रत करतात. यात सूर्यदेवाची उपासणा केली जाते. खास करून आपल्या प्रांतात, आपल्या गावात जाऊन हे व्रत करण्याला उत्तर भारतीय मंडळी प्राधान्य देता. त्यामुळे त्यांनी गेल्या काही तासांपासून आपल्या गावांचा रस्ता धरणे सुरू केले आहे.
नागपूर-विदर्भात बिहार, उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील मंडळी मोठ्या संख्येत स्थिरावले आहेत. काही जण रोजमजुरी करतात. तर अनेक जण पालेभाज्या, फळे, पूजेचे साहित्य विकतात. हातगाड्यांवरून त्यांचा हा व्यवसाय चालतो. दिवाळीत त्यांचा चांगला व्यवसाय होतो. त्यातून चार पैसे गाठीशी येत असल्यामुळे नंतर ही मंडळी छट पूजे साठी आपल्या गावाला जातात. सध्या छटपूजेचे महापर्व पुढ्यात असल्याने त्यांची आपल्या गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. परिणामी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी बघायला मिळते.
प्रत्येकच गाडी हाऊसफुल्ल !नागपूर रेल्वे स्थानकावरून रोज साधारणत: १५ ते २० रेल्वेगाड्या उत्तर भारतातील विविध शहरात जातात. गेल्या काही दिवसांपासून या सर्वच्या सर्व गाड्या प्रवाशांनी अक्षरश: फुलल्याचे दिसून येते. कोणत्याच गाडीत पाय ठेवायला जागात नसल्याचेही चित्र आहे. जेवढे प्रवासी नागपुरात उतरतात त्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त प्रवासी नागपूर स्थानकावरून या गाड्यांमध्ये चढत असल्याने गाड्यांमधील गर्दीत अधिकच भर पडत आहे.