नागपूर : माणसाला माणूस म्हणून जगता यावे, यासाठी आयुष्यभर लढा देणारे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ एप्रिल रोजी संविधान चौकात रात्री १२ च्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात हजारो भीमसैनिकांनी जल्लोष केला. निळ्या गुलालाची उधळण करीत बाबासाहेबांची जयंती साजरी केली. यावेळी संविधान चौकातील चारही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले होते.
गुरुवारी रात्री ८ वाजता इंदोरा बुद्धविहारातून डॉ. आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीला प्रारंभ झाला. इंदोरा बुद्धविहार, अखिल भारतीय धम्मसेना आणि आंबेडकरी अनुयायींच्या संयुक्त वतीने निघालेल्या डॉ. आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीत उपासक, उपासिका आणि अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. पंचशील ध्वज, बग्गी, रथ आकर्षणाचे केंद्र ठरले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब यांचे छायाचित्र असलेले तसेच इतर देखाव्यांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. पंचशील ध्वज, निळी टोपी लक्ष वेधून घेत होती.
‘बुद्धम शरणम् गच्छामी। धम्मम शरणम् गच्छामी। संघम शरणम् गच्छामी।’ बुद्धवंदना म्हणत मिरवणूक इंदोरा चौक, कामठी मार्गाने निघाली. भीम सैनिक हुतात्मा चौक, कडबी चौक, मंगळवारी उड्डाणपूल, गड्डीगोदाम, एलआयसी चौक मार्गाने संविधान चौकात पोहोचली. भदंत ससाई यांच्या हस्ते संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्धवंदनेनंतर ससाईंनी अनुयायांना मार्गदर्शन केले. रात्री १२ च्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात भीमसैनिकांनी जल्लोष केला. निळ्या गुलालाची उधळण केली.
निळ्या पाखरांनी फुलले रस्ते
शहरातील प्रत्येक बुद्धविहारातून मिरवणूक काढण्यात आली. रात्री १२ वाजेपर्यंत शहराच्या चारही भागांतील मिरवणुका संविधान चौकात एकत्रित झाल्या. अनुयायांच्या गर्दीने रस्ते फुलले होते. लख्ख अशा रोषणाईने मध्यरात्री दिवस असल्याचा भास होत होता. संविधान चौक निळ्या पाखरांनी फुलला होता. निळ्या गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भीम जल्लोष पहाटेपर्यंत सुरू होता. बाबासाहेबांची जीवनगाथा सांगणाऱ्या गीतांमुळे अनुयायांमध्ये जोश संचारला होता. यावेळी संविधान चौकात आंबेडकरी जलसा हा संगीतमय कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. मुक्तिवाहिनीच्या वतीने काव्यगाज अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कवींनी कवितेच्या माध्यमातून अभिवादन केले.