लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बसपाचे माजी शहर अध्यक्ष विवेक हाडके आणि माजी प्रदेश सचिव प्रफुल्ल माणके यांनी बसपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हाडके आणि माणके हे बसपाचे कॅडर बेस कार्यकर्ते मानले जातात. बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे पत्र त्यांनी जारी केले आहे. या राजीनाम्यामुळे बसपा कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
विवेक हाडके हे बसपाचे माजी शहर अध्यक्ष राहिलेले आहेत. यासोबतच ते जिल्हा प्रभारी आणि प्रदेश कमिटीचे सदस्यही राहिले आहेत. इतकेच नव्हे तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही ते लढले हाेते. प्रफुल्ल माणके हे सुद्धा प्रदेश सचिव होते. कामठी विधानसभेतून त्यांनीही विधानसभेची निवडणूक लढवली आहे. हाडके आणि माणके यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना एक संयुक्त पत्र लिहून आपण बसपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. यात त्यांनी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांच्या पक्ष विरोधी कार्यशैलीमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. यासोबत ताजणे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून एकही निवडणूक लढवली नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. पक्षाचे संघटन जाणीवपूर्वक कमजोर करण्याचे काम केले. आजवर घेतलेले सर्व निर्णय हे संशयास्पद आहेत. बसपाला संपवण्याचे काम करीत असल्याची टीकाही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे काम यापुढेही करीत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून ऐन निवडणुकीनंतर बसपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीतही ते दिसून आले.
बॉक्स
पदवीधर निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांना पक्षाचे समर्थन
पदवीधर मतदार संघाची निवडणूक कालच पार पडली. ही निवडणूक बसपाने लढली नाही. बसपा कुणाला समर्थन देते याकडे सर्वांचे लक्ष लागून हाेते. शेवटपर्यंत पक्षाकडून समर्थन देत असल्याचे जाहीर करण्यात आले नाही. मात्र त्याचवेळी अपक्ष उमेदवार प्रा. प्रशांत डेकाटे आणि मो. शाकीर अब्दुल गफ्फार यांना प्रदेशाध्यक्ष ताजणे यांच्या स्वाक्षरीचे समर्थन पत्र जारी झाल्याचे एक पत्र सोशल मीडियावर फिरले. एक नव्हे तर दोन-दोन अपक्ष उमेदवारांना समर्थन जारी होत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांनाही प्रश्न पडला होता.
बॉक्स
तीन दिवसापूर्वीच पक्षातून काढले
राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. दोघांनाही तीन दिवसापूर्वीच पक्षातून काढण्यात आले आहे.
संदीप ताजणे, प्रदेशाध्यक्ष बसपा