नागपूर : पंजाबमधील सराफा व्यापाऱ्याचे १३०० ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये घडलेली ही धाडसी चोरीची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदविली. लखविंदर सिंग (वय ४९) असे तक्रारदार सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे.
लखविंदर यांचा सोने-चांदीचे दागिने विकण्याचा व्यवसाय असून, ते त्यानिमित्ताने नेहमीच नागपुरात येतात. रविवारी पहाटे ४ च्या सुमारास ते अमृतसर- नागपूर एक्स्प्रेसमध्ये त्यांच्या मुलासह बसले. त्यांच्याकडे नियमित वापरण्याचे कपडे, जुजबी साहित्य आणि एका बॅगमध्ये गोफ, अंगठी, बांगड्या, कानातील रिंग यासह वेगवेगळ्या वजनाचे आणि डिझाइनचे १३०० ग्रॅम सोन्याचे दागिने होते. रेल्वेगाडीच्या बी - २ डब्यात सिंग बापलेक बसून होते. सोमवारी पहाटे ३ वाजता ही रेल्वेगाडी नागपूर स्थानकावर आली. त्यानंतर सिंग यांनी गाडीतून उतरण्यापूर्वी आपले सामान तपासले.
एका बॅगमध्ये प्लॅस्टिकच्या पन्न्यांमध्ये ठेवलेले सर्वच्या सर्व दागिने गायब असल्याने ते हादरले. त्यांनी रेल्वे पोलीस ठाणे गाठून दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. तब्बल सव्वा किलो सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी लगेच अमृतसर- नागपूर एक्स्प्रेसची ती बोगी आणि आजूबाजूची आसने (सीट) तपासली. मात्र, काहीही आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
चोरी नेमकी कुठे झाली?
चोरट्याने सिंग यांचे दागिने लंपास केले, मात्र नेमकी चोरी कुठे झाली ते सिंग यांच्या लक्षात आले नाही. अमृतसरहून रविवारी पहाटे डब्यात बसल्याच्या काही वेळानंतर सिंग पितापुत्र छातीशी सोन्याची बॅग धरून काही वेळ झोपले होते. नंतर रविवारी रात्री ९ च्या सुमारास भोपाळ येण्यापूर्वी ते झोपले आणि थेट नागपूर स्थानकावरच त्यांना जाग आली. विशेष म्हणजे, चोरट्याने बॅग नव्हे तर बॅगची चेन उघडून त्यातील दागिने ठेवलेली पन्नी चोरली.
पोलीस पथक अमृतसरकडे
या चोरीची माहिती कळताच रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ लगेच ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सिंग यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक तपासासाठी अमृतसरकडे रवाना केले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ५२ ते ५३ लाख रुपये असल्याचे समजते.