मेडिकलमधील प्रकार : हाडांची घनता तपासणारे ‘डेक्सा स्कॅन’ यंत्र रुग्णापासून दूर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुठल्याही आजाराच्या उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा असतो. या यंत्रामुळे रुग्णाचे योग्य निदान व उपचारास मदत होते. म्हणूनच रुग्णालयातील विविध विभाग अद्ययावत यंत्राची मागणी रेटून धरीत असतात. शासनही रुग्णांची गरज लक्षात घेऊन निधी देते. परंतु एकदा यंत्र रुग्णालयात आल्यास अचानक त्याचे महत्त्व संपते. हा प्रकार सर्वच शासकीय रुग्णालयांमधील आहे. यातून मेडिकलही सुटलेले नाही. तब्बल दीड कोटी रुपयांचे ‘डेक्सा स्कॅन’ यंत्र मेडिकलमध्ये येऊन चार महिन्यांचा काळ लोटला, परंतु अद्यापही हे यंत्र डब्यातच बंद आहे. मेडिकलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. रुग्णांच्या आजाराचे तत्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावे म्हणून १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली. याच योजनेतून अस्थिरोग विभागाने ‘डेक्सा स्कॅन’ यंत्राची मागणी केली. हाडे योग्य पद्धतीने कार्य करत आहेत का, ते पाहण्यासाठी या यंत्राची मदत घेतली जाते. या यंत्राद्वारे हाताची दोन्ही मनगटे, कंबरेचे हाड, पाठीचा कणा व सांध्याच्या मजबुतीची माहिती करून घेता येते. रुग्णाला होणारा हाडांचा त्रास व लक्षणे याचे निदान करण्यास हे यंत्र मदत करते. हाडांच्या रुग्णासाठी महत्त्वाचे असलेले हे यंत्र फेब्रुवारी २०१७ मध्ये मेडिकलमध्ये उपलब्ध झाले. सूत्रानुसार, हे यंत्र रुग्णालयात येताच याची जबाबदारी औषधवैद्यकशास्त्र विभागान स्वीकारली. मात्र हे यंत्र स्थापन करायला जागाच मिळेना. यात दोन महिन्यावर कालावधी गेला. पुन्हा यात अधिष्ठात्यांना लक्ष घालावे लागले. अपघात विभागातील अपंगांना प्रमाणपत्र वाटप करणारे कक्ष रिकामे करून तिथे ‘डेक्सा स्कॅन’ स्थापन करण्याचे त्यांनी निर्देश दिले. परंतु आता या यंत्राच्या कंपनीचे अभियंता हे यंत्र लावण्यास उशीर करीत असल्याचे समजते. चार महिने लोटूनही यंत्रापासून रुग्ण वंचित असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
दीड कोटींचे यंत्र डब्यातच
By admin | Published: June 17, 2017 2:33 AM