लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार लाखांत दीड किलो सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करू पाहणाऱ्या एका आरोपीचा डाव सौरभ मनोज झा (वय १९) नामक तरुणाने उधळला. सौरभच्या सतर्कतेमुळेच लकडगंज पोलिसांनी आरोपी लखन धर्मा राठोड (वय २५, रा. माथनी, मौदा) याच्या मुसक्या बांधण्यात यश मिळवले.फिर्यादी सौरभ गरोबा मैदानाजवळच्या आदर्शनगर गल्लीत राहतो. तो आणि त्याचे काका भैयालाल शिवकुमार झा (वय ५५) ३ मार्चला रात्री भाजीपाला घेण्यासाठी लकडगंजमधील जनता हॉलजवळ आले होते. तेथे त्यांना आरोपी राठोड भेटला. त्याने सौरभला बाजूला नेले. आम्हाला खोदकामात मोठ्या प्रमाणावर सोने सापडले आहे असे सांगून चार लाख रुपयात दीड किलो सोने देतो, असे राठोड म्हणाला. तुला सोने घ्यायचे असेल तर दोन दिवसांनी भेट, असेही तो म्हणाला. त्यानुसार, ५ मार्चला सौरभने आरोपी राठोडची भेट घेतली. त्याने सोने घ्यायची तयारी दाखवताच आरोपीने सौरभला सोन्याचे दोन मनी देऊन ते खरे की खोटे त्याची शहानिशा करण्यास सांगितले. त्या बदल्यात राठोडने सौरभकडून एक हजार रुपये अॅडव्हॉन्सही घेतला. दुसऱ्या दिवशी सौरभने सोन्याच्या मन्यांची सराफांकडून शहानिशा करवून घेतली. ते खरे असल्याचे सराफाने सांगितले. मात्र, चार लाखांमध्ये दीड किलो सोने कुणी कसे देणार, हा प्रश्न सौरभला सतावत होता. आमिष दाखवणारा राठोड ठगबाजी करीत असावा, असा संशय आल्याने सौरभने त्याला ७ मार्चच्या रात्री ८ वाजता सोने घेऊन येण्यास सांगितले. इकडे लकडगंज पोलिसांनाही माहिती दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी रात्री ८ वाजता लखन राठोड सौरभला भेटला. त्याने चार लाख रुपये आणले काय, अशी विचारणा केली. सौरभने हो म्हणत त्याला सोने दाखवायला सांगितले. राठोडने दागिन्याची पिशवी दाखवताच सौरभने बाजूला घुटमळणाºया पोलिसांना इशारा केला. त्याचवेळी लकडगंज पोलिसांनी गराडा घालून राठोडला जेरबंद केले.सतर्कतेमुळे डाव उलटलाआरोपी राठोडने सोने म्हणून एक पिवळ्या धातूची एक किलो वजनाची माळ आणली होती. ती सौरवला देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये हडपण्याचा त्याचा डाव होता. मात्र, सौरभच्या सतर्कतेमुळे तो फसला.