गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारने २७ ऑगस्ट २०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) अधिकार काढून नागपूर शहरात महापालिकेला नियोजन प्राधिकरणाचे अधिकार बहाल केले होते. या निर्णयासोबतच गुंठेवारी विभाग नासुप्रकडून मनपाच्या नगर रचना विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने गुंठेवारी योजनेतील ले-आऊट व भूखंडांच्या १० हजार फाईल मनपाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ होताच नासुप्रला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला. गुंठेवारी विभाग नासुप्रकडे आल्याने मनपा प्रशासनाकडे फाईलची मागणी केली असता १५०० फाईलचा शोध लागत नसल्याने त्या गहाळ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नियोजन प्राधिकरणाचे अधिकार मिळताच मनपाच्या नगर रचना विभागाने नागपूर शहरातील अनधिकृत भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू केली. यासाठी नासुप्रकडून १० हजाराहून अधिक फाईल मागविण्यात आल्या होत्या. आता पुन्हा नासुप्रला अधिकार प्राप्त झाल्याने पाठविलेल्या फाईल परत मिळाव्या यासाठी नगर रचना विभागाला पत्र पाठविले. त्यानुसार आठ हजार फाईल परत मिळाल्या. उर्वरित १५०० ते २००० हजार फाईल अजूनही परत मिळालेल्या नाही. अशी माहिती नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भात तक्रार केल्यानंतर मनपा आयुक्तांनी नगर रचना विभागाला आठ दिवसात फाईलचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शोध घेण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे आमच्याकडे नासुप्रच्या कोणत्याही फाईल नसल्याचा दावा नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे गहाळ झालेल्या फाईल कुठे गेल्या. त्या कुठले ले-आऊट व भूखंडाच्या होत्या असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
...
आठ दिवसात छाननी करा
नासुप्रच्या मागणीनुसार त्यांना फाईल परत न मिळाल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नगर रचना विभागाला फाईलची आठ दिवसात छाननी करण्याचे आदेश दिल्याची माहिती नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिली. परंतु छाननीत फाईल न मिळाल्यास प्रशासन काय भूमिका घेते याकडे भूखंड धारकांचे लक्ष लागले आहे.
..............
दहा हजारापैकी आठ हजार फाईल मिळाल्या
मनपाच्या नगर रचना विभागाला गुंठेवारी योजनेच्या १० हजार फाईल दिल्या होत्या. परंतु आता हा विभाग नासुप्रकडे आल्याने आम्ही फाईल परत करण्याबाबत मनपाला पत्र दिले. आठ हजार फाईल मिळाल्या. उर्वरित दीड ते दोन हजार फाईल मिळालेल्या नाही. दिलेल्या व मिळालेल्या प्रत्येक फाईलची नासुप्रच्या रेकॉर्डला नोंद आहे. न मिळालेल्या फाईलचा शोध घेण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी नगर रचना विभागाला दिले आहेत.
-ललित राऊत, कार्यकारी अधिकारी नासुप्र
....
मनपाकडे नासुप्रची एकही फाईल नाही
महापालिकेला नियोजन प्राधिकरणाचे अधिकार मिळाल्यानंतर गुंठेवारी विभाग नासुप्रकडून मनपाकडे आला होता. या योजनेच्या सोपविलेल्या सर्व फाईल नासुप्रला परत केलेल्या आहेत. आमच्याकडे आता कोणत्याही स्वरुपाच्या फाईल प्रलंबित नाही. त्यामुळे नासुप्रच्या फाईल आमच्या विभागाकडे असण्याचा प्रश्नच नाही.
- हर्षल कांबळे, सहायक संचालक, नगर रचना मनपा