नागपूर : पत्नी गर्भवती असल्यामुळे सव्वा वर्षाच्या मुलीला जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये सोडून तिच्या पालनपोषणाची जबाबदारी झटकणाऱ्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल ११ दिवस लोहमार्ग पोलिसांनी या चिमुकलीचा शोध घेतला असता ही चिमुकली वर्धा जिल्ह्यातील सिंधी गावात एका महिलेकडे सुखरूप आढळली आहे. सध्या या चिमुकलीला श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयात ठेवण्यात आले आहे.
कृष्णकुमार राजकुमार कौशले (तांदुळ, पो. पलौद, जि. रायपूर) असे आरोपी बापाचे नाव आहे. तो आपली पत्नी ललीता कौशले व सव्वा वर्षाची मुलगी जिज्ञासासोबत दि. ६ नोव्हेंबरला चेन्नई येथून कामावरून परत पलोद येथे जात होता. दि. ७ नोव्हेंबरला रात्री २ वाजता ते नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. कृष्णकुमारची पत्नी ललीता आणि चिमुकली जिज्ञासा झोपी गेल्या असताना त्याने चिमुकल्या जिज्ञासाला उचलून १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये बेवारस सोडून दिले होते. त्यानंतर त्याने स्व:त आपली मुलगी हरविल्याची तक्रार शांतीनगर ठाण्यात दिली.
पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यानेच चिमुकलीला रेल्वेत बेवारस सोडून दिल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी वर्धा, पुलगाव, सिंधी परिसरात चिमुकल्या जिज्ञासाचा शोध घेतला. अखेर ही चिमुकली गीता अंभोरे (लादेन मोहल्ला, सिंधी) यांच्याकडे असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भलावी, हवालदार संजय पटले, प्रवीण खवसे, पुष्पराज मिश्रा, शैलेश उके, रंजना कोल्हे, नाजनीन पठाण यांनी या चिमुकलीला ताब्यात घेतले.
बापाने सोडल्यानंतर रडू लागली चिमुकली
आरोपी बाप कृष्णकुमारने जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये झोपेत असलेल्या चिमुकल्या जिज्ञासाला सोडले. झोपेतून जागी झाल्यानंतर आईवडील जवळ न दिसल्यामुळे जिज्ञासा रडू लागली. यावेळी जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्या सिंधी येथील रहिवासी गीता अंभोरे यांनी या चिमुकलीला जवळ घेतले. त्यांनी तिच्या आईवडिलांचा शोध घेतला. परंतु तिचे आईवडील न आढळल्यामुळे चिमुकलीला वाऱ्यावर सोडून देण्यापेक्षा त्यांनी तिलासोबत सिंधी येथे आपल्या घरी नेले. परंतु पोलीस या मुलीचा शोध घेत असल्याचे समजताच त्यांनी सिंधी पोलीस ठाण्यात हजर राहून या चिमुकलीला पोलिसांच्या स्वाधीन केले.