योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: उपराजधानीत शस्त्रांच्या खरेदी-विक्रीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात समोर आलेल्या पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
मोहम्मद फिरोज ऊर्फ मोहम्मद आबिद अंसारी (२४, दीनबंधू सोसायटी, गुलशननगर) याच्याकडे पिस्तूल असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तीन एप्रिल रोजी त्याला अटक केली. त्याने हे पिस्तूल करीम राजा मोहम्मद युनूस (२४,मेमन कॉलनी, जुना कामठी रोड, कळमना) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालादेखील अटक केली.
त्याच्या चौकशीत त्याने पिस्तूल मोहम्मद शाकिब ऊर्फ पटेल मोहम्मद सिद्दीकी (२८, संजीवनी कॉलनी, यशोधरानगर) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील लिंक शोधली असता अब्दुल सोहेल ऊर्फ सोबू (सतरंजीपुरा) आणि शेख अझहरुद्दीन शेख सलाउद्दीन (२०, विटा भट्टी चौक, यशोधरानगर) यांच्याकडून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांकडून या दोघांचाही शोध सुरू आहे. पोलिसांनी शेख अझहरूद्दीन याला सोमवारी अटक केली. पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, नवनाथ देवकाते, मिलिंद चौधरी, प्रवीण लांडे, अमोल जासूद, संतोष चौधरी, मनीष रामटेके, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.