लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्यातील सत्तेत परतलेली काँग्रेसही नव्या जोशाने काामाला लागली आहे. ‘एक बुथ दहा युथ’ या पद्धतीने प्रत्येक बुथ मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. तसेच पक्षातील विविध सेलसुद्धा बुथ सत्रावर मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काॅंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी देवडिया काॅंग्रेस भवन कार्यालयात ब्लॉक अध्यक्ष, ब्लॉक समन्वयक, फ्रन्टल अध्यक्ष यांची संयुक्त बैठक पार पडली. मनपा निवडणूक लक्षात घेता ब्लॉक अध्यक्षांनी बुथ कमिट्या तयार कराव्या. एका बुथवर दहा युवकांचा समावेश करावा. यासाठी आपल्या ब्लॉकमधील शहर पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, मनपातील पराभूत उमेदवार यांच्याशी संपर्क करुन पहिल्या टप्प्यामध्ये एक बुथवर ५ कार्यकर्त्यांची यादी तयार करा. जेवढे बुथ असतील त्या पद्धतीने बुथ कमिट्या लवकरात लवकर बनवून शहर काॅंग्रेस कमिटीकडे द्याव्या, असे निर्देश आमदार ठाकरे यांनी दिले. तसेच फ्रन्टल सेलच्या अध्यक्षांनीसुध्दा सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी तयार करावी. सर्व ब्लॉक अध्यक्षांनी बुथनिहाय कार्यकर्त्यांची बैठक लावावी, असे सांगितले.
या बैठकीला शहर काॅंग्रेस कमिटीचे प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार, शहर काॅंग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष मनोज गोलावार, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ईरशाद अली, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुधीर अघाव, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, गोपाल पटटम, अब्दुल शकील, राजेश पौनीकर, प्रवीण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, पंकज थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.