नागपूर : गुन्हे शाखेने प्रतिबंधित सुपारीच्या संशयावरून पूर्व नागपूरच्या ट्रान्सपोर्ट प्लाझा परिसरात धाड टाकून जवळपास एक कोटी रुपयांची सुपारी जप्त केली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे शहरातील सुपारी व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना दिल्लीवरून प्रतिबंधित सुपारीचा ट्रक नागपूरला आल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात युनिट तीनचे निरीक्षक प्रमोद रायण्णावारने लकडगंजच्या ट्रान्सपोर्ट प्लाझा परिसरात धाड टाकली. पोलिसांनी दिल्लीवरून आलेल्या एका ट्रकला थांबविले. त्यात सुपारीचे ३५० पोते असल्याची माहिती समजली. चालकाने चौकशीत ट्रक मऊ राणीपूर ट्रान्सपोर्टचे अनुप नगरिया यांचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी नगरिया यांना पाचारण केले. त्यांनी कागदपत्र दाखवून सुपारी दिल्लीवरून आल्याचे सांगितले.
कारवाईदरम्यान पोलिसांना राजेश पाहुजा नावाच्या व्यापाऱ्याच्या गोदामात प्रतिबंधित सुपारी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना तेथे येताना पाहून गोदामाजवळ असलेले मजूर पळून जात होते. पोलिसांनी गोदामाची तपासणी केली असता, त्यात १२० सुपारीची पोती आढळली. पोलीस इतर ठिकाणी धाड टाकतील अशी शंका आल्यामुळे कापसी खुर्दच्या बीअर बारजवळ असलेल्या गोदामातून एक कोटी रुपयांची सुपारी सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची एफडीएला सूचना दिली. एफडीएचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी अनुप नगरिया तसेच राजेश पाहुजाच्या गोदामातून मिळालेल्या सुपारीची तपासणी केली. एफडीएने गोदाम सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. ते सुपारीच्या नमुन्यांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस अनुप नगरिया तसेच राजेश पाहुजा यांच्याकडून मिळालेल्या जीएसटी तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. यात त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेने तीन वर्षापूर्वीही ट्रान्सपोर्ट प्लाझा परिसरात अनुप नगरियाची सुपारी पकडली होती. सूत्रानुसार जप्त केलेली सुपारी एका चर्चेतील व्यापाऱ्यासाठी बोलाविण्यात आली होती. या व्यापाऱ्याविरुद्ध अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मागील आठवड्यात चेन्नई येथे मोठ्या प्रमाणात सुपारी आली होती. त्यातील काही सुपारी नागपूरला आली आहे. प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यास धक्कादायक माहिती बाहेर येऊ शकते. पोलीस डीआरआय(डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स)ला कारवाईची सूचना देणार आहेत.