नागपूर : भाकपा कार्यालय, गणेशपेठ येथे रविवारी एक दिवसीय विद्यार्थी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन छायाचित्रकार संगीता महाजन यांनी केले. प्रा. युगल रायलु, सुकुमार दामले आदी यावेळी उपस्थित होते. संगीता महाजन म्हणाल्या, आत्मविश्वासाच्या बळावर महिलादेखील पुरूषी क्षेत्रात यश संपादन करू शकतात. प्रा. युगल रायलु यांनी तत्वज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. किसान सभेचे जिल्हा सचिव अरूण वनकर, श्याम काळे यांनीही मार्गदर्शन केले. आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले यांच्या उपस्थितीत समारोप झाला. राष्ट्राच्या उभारणीत आणि सर्वच देशांमधील क्रांत्यांमध्ये युवकांचा पुढाकार महत्त्वाचा होता. त्यामुळे युवा शक्तिला कमजोर समजू नका, असे आवाहन त्यांनी केले. शिबिराला १४ विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते. ५ जूनपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षा शिबिरासाठी सिद्धार्थ पराते, राहुल साखरे, रिदम काळे, श्रावणी मडावी, राहुल गजभिये यांची निवड करण्यात आली.
एक दिवसीय विद्यार्थी प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:07 AM