पारशिवनी : शेतातील विहिरीतून पाणी काढताना अचानक ताेल गेल्याने ताे विहिरीत पडला. त्यातच खाेल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्यांतर्गतच्या परसाेडी शिवारात गुरुवारी (दि. ९) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
ओमप्रकाश काेदूजी मेश्राम (५१, रा. परसाेडी, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. ओमप्रकाश हा बुधवारी ११ वाजताच्या सुमारास जेवण करून घरून निघून गेला हाेता. सायंकाळ हाेऊनही ताे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा गावात तसेच नातेवाईकांकडे शाेध घेतला. परंतु ताे कुठेही आढळून आला नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नातेवाईकांनी त्याच्या पिपळा परिसरातील शेतात जाऊन पाहिले असता, शेतातील विहिरीजवळ त्याच्या चपला आढळून आल्या व विहिरीवरील पाणी काढण्याची बादली विहिरीत पडली दिसली. त्यामुळे ओमप्रकाश विहिरीत पडला असावा, अशी शंका आल्याने त्यांनी विहिरीत डाेकावले असता, विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पारशिवनी पाेलिसांना सूूचना देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने पाेलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. ओमप्रकाशला दारूचे व्यसन हाेते. घटनेच्या दिवशीही ताे दारू प्यायला हाेता. पाणी पिण्याकरिता विहिरीजवळ गेला असता, त्याचा ताेल गेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.