लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : जुन्या विहिरीच्या खाेलीकरण कामादरम्यान मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी कर्यात शिवारात गुरुवारी (दि.३) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
गणेश सलामे (३५, रा. अंबाेला, ता. नरखेड) असे मृताचे नाव असून, पांडुरंग धुर्वे (४०, रा. अंबाेला, ता. नरखेड) असे जखमीचे नाव आहे. शेतकरी मनाेहर माेतीराम धाेटकर (५०, रा. आयूडीपी काॅलनी, नरखेड) यांची खेडी कर्यात शिवारात शेती असून, शेतातील ८० फूट खाेल विहिरीच्या खाेलीकरणाचे काम पांडुरंग धुर्वे यांना दिले हाेते. गुरुवारी सकळी ८ वाजताच्या सुमारास विहिरीत ब्लास्टिंग केल्यानंतर क्रेनद्वारे विहिरीतील मलबा उपसण्याचे काम सुरू हाेते. मलबा उपसण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच विहिरीचा अर्धा भाग विहिरीच्या आत असलेल्या गणेश सलामे, पांडुरंग धुर्वे यांच्या अंगावर पडला. त्यात गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पांडुरंग धुर्वे हा जखमी झाला. जखमीला नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. या कामादरम्यान निखील धुर्वे (२५) हादेखील विहिरीत हाेता. मात्र ताे थाेडक्यात बचावला.
याप्रकरणी नारायण सीताराम सलामे यांच्या तक्रारीवरून नरखेड पाेलिसांनी भादंवि कलम १७४ अन्वये घटनेची नाेंद केली असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक लक्ष्मीकांत बांदरे करीत आहेत.