लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकच शेतजमीन दोघांना विकून महिलेची दोन कोटीने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोराडी पोलिसांनी या प्रकरणात कामठीतील व्यापाऱ्यासह सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सुमीत सुनील अग्रवाल, रा. कामठी, विमलाबाई मारोती सूर्यवंशी (७०), कमलाकर मारोती सूर्यवंशी (४२), हनुमंत मारोती सूर्यवंशी (४०), ज्योती कवडुजी तडवणकर (३८) रा. बुटीबोरी , राजुसबाई कमलाकर खुजवारे (३६) रा. धापेवाडा कळमेश्वर अशी आरोपीची नावे आहे. सूर्यवंशी परिवाराची कोराडी बोखारा येते साडेतीन एकर शेतजमीन आहे. रुपाली उमेश ढोक (३५) रा. सिद्धार्थनगर टेका यांनी या जमिनीचा सौदा केला. ढोक यांनी २४ जुलै २०१७ ते २५ मार्च २०१८ दरम्यान आरोपींना १ कोटी ९५ लाख रुपये दिले. आरोपींनी ढोक यांना जमिनीची रजिस्ट्री करून कब्जाही दिला. ढोक यांनी या जमिनीवर युनिक लॅण्ड डेव्हलपर्स नावाचा बोर्ड लावला. आरोपींना ढोक यांना काही दिवसानंतर सात-बारामध्ये फेरबदल करण्याचे आश्वासन दिले. परंतु काही दिवस उलटल्यानंतर आरोपी सात-बारात फेरबदल करीत नसल्याने फिर्यादीने तगादा लावला.परंतु सूर्यवंशी परिवार काही करायला तयार नव्हते. यातच सुमीत अग्रवाल मध्ये आले. त्यांनी ढोक यांचा बोर्ड हटवून स्वत:चा बोर्ड लावला. त्यांनी जमिनीवर अतिक्रमणही केले. त्यांचे म्हणणे आहे की. त्यांनी सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाकडून या जमिनीचा सौदा केला आहे. ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलेला करारनामा दाखवित जमीन आपली असल्याचे सांगितले. यानंतर रुपाली ढोक यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्लॉट विकून ४६ लाखाची फसवणूकबोगस दस्तावेजाच्या आधारावर प्लॉट विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरुण धनंजय देशभ्रतार, राजेश दिलीपराव पंत, मुकुल वानखेडे, जितेंद्र छन्नालाल खजेरीया आणि त्यांचा एक साथीदार असे आरोपीचे नाव आहे. आरोपींनी बोगस व्यक्तीला उभे करून बेलतरोडी येथील रहिवासी आलेख शर्मा यांना प्लॉटची विक्री केली. त्या जागेवर घर बनवून देण्याचे आमिष दाखवून ४६ लाख रुपये वसूल केले. काही दिवसानंतर शर्मा यांना अपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याचप्रकारे भीमरत्न आगलावे (५०) रा. उंटखाना दहीपुरा ले-आऊट यांनी २१ हजार रुपयात करारनामा करून प्लॉट विकत घेतला होता. आरोपी माणिकराव सोनवणे यांना प्लॉटची मोजणी करून मागितली असता आरोपी पळून गेला. आगलावे यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.