हायकोर्टाचा एक मजला वाढणार; वकिलांची गैरसोय होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 09:58 PM2023-03-29T21:58:07+5:302023-03-29T21:58:32+5:30
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने साऊथ एनेक्स इमारतीवर आणखी एक मजला बांधला जाणार आहे.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिलांना बसण्याची सोय नसल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होते आहे. ही समस्या आता सुटणार असून जवळपास एक हजार वकिलांच्या बसण्याची सोय होणार आहे. त्यासाठी साऊथ एनेक्स इमारतीवर आणखी एक मजला चढणार असणार असून तेथे ही बसण्याची सोय केली जाणार आहे. राज्य सरकारने तसा शासन आदेशही पारित केला आहे.
बऱ्याच काळापासून ही मागणी होत होती. दुसरा मजला बांधण्यात येऊन तेथे वकिलांच्या बसण्याची सोय व्हावी, असा प्रस्ताव होता. सुमारे सव्वा वर्षांपूर्वी हायकोर्ट बार असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे व सचिव अमोल जलतारे यांनी यासाठी शासनस्तरावर बराच पाठपुरावा केला. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला या खंडपीठाला भेट दिली. तेव्हासुद्धा ही मागणी समोर आली. तसेच न्यायमूर्ती सुनील शुक्रे, अनिल किलोर यांनीसुद्धा यासाठी प्रयत्न केले. अखेर, बुधवारी राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य केला. विधी व न्याय विभागाने या बांधकामासाठी तब्बल ३ कोटी १८ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मान्य केला आहे. या निधीतून साऊथ एनेक्स बिल्डिंगवर बांधकाम होणार आहे. या निर्णयामुळे प्रामुख्याने तरुण वकीलवर्गाची सोय होईल, अशी माहिती ॲड. पांडे यांनी दिली.
रेन वॉटर हार्वेस्टिंग
नव्याने बांधल्या जात असलेल्या बहुतांश सरकारी इमारतींमध्ये सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचीही कामे केली जात आहे. या इमारती सौर ऊर्जेवर चालविले जात नाहीये. तरीसुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय केली जाणार आहे. त्यासाठी ५ लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. तसेच अग्नीशमन सुविधेसाठीसुद्धा ५ लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.