नागपूर : स्वच्छ भारत अभियानात माघारल्यानंतर अखेर मनपाची झोप उडाली आहे. याअंतर्गत कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करून ओला व सुका कचरा भांडेवाडी येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ७० टक्के कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. भांडेवाडी येथे ओला व सुका कचरा वेगवेगळा पोहचविण्यासाठी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना आवश्यक दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहे.
शहरात दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. यात ५५० मेट्रिक टन ओला व ४०० मेट्रिक टन सुका कचरा असतो. तर १५० टन कचरा संमिश्र असतो. बांधकाम साहित्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लवकरच नवीन कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी घनकचरा विभाग कामाला लागला आहे. काही दिवसांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दोन्ही कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत.
जनजागृतीसाठी स्मार्ट टीम
शहरातील नागरिकांत जनजागृती करण्यासाठी ५०० सफाई कर्मचाऱ्यांची स्मार्ट टीम गठित करण्यात आली आहे. या पथकाद्वारे शहरातील ३८ प्रभागात कचरा वेगवेगळा संकलित करण्याबाबत जनजागृती करून याचे फायदे सांगत आहे. चार पथकांवर नियंत्रणासाठी एक स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे.
स्वच्छतेला प्राधान्य
स्वच्छतेत नागपूर शहराचे रँकिंग सुधारण्यासाठी व नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी आवश्यक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. शंभर टक्के ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
- घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा संकलन कंपन्यांना आवश्यक दिशा-निर्देश जारी केले.
- सध्या भांडेवाडी डंपिंग यार्ड येथे ७० टक्के वर्गीकृत कचरा आणला जातो.
-शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो.