लाेकमत न्यूज
देवलापार : वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहनाने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दाेघांपैकी एकाचा मृत्यू, तर अन्य एक जखमी झाला आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्यातील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील चाेरबाहुली ते मुखनापूरदरम्यान साेमवारी (दि. २६) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.
राजू महादेव सोनगंधे (४५, रा. मसला, ता. रामटेक) असे मृताचे, तर घनश्याम भगवान बाजनघाटे (४३, रा. नवेगाव-मुसेवाडी, ता. रामटेक) असे जखमीचे नाव आहे. दाेघेही साडूभाऊ असून, ते मोटारसायकलने (क्र. एमएच ४० एव्ही-८७७०) नवेगावहून पवनी (ता. रामटेक)ला जात हाेते. ते नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील चाेरबाहुली ते मुखनापूरदरम्यान प्रवास करीत असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या माेआरसायकलला जाेरात धडक दिली. यात दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही मनसर (ता. रामटेक) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे डाॅक्टरांनी राजू यांना तपासणीअंती मृत घाेषित केले, तर घनश्याम यांच्यावर उपचार करून त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. धडक दिल्यानंतर चारचाकीचालक पळून गेला. धडक देणारे वाहन बाेलेराे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे हे करीत आहेत.