पवनी (रामटेक) : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-जबलपूर महामार्गावर पवनी गावानजीक शुक्रवारी (दि.१३) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
राजकुमार हरिलाल मरसकाेल्हे (२२, रा. वाडी, नागपूर) असे मृत दुचाकी चालकाचे नाव असून, नुतेशकुमार रामदयाल रहांगडाले (१८, रा. कल्याणपूर, ता. बरघाट, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) असे जखमीचे नाव आहे. राजकुमार व नुतेशकुमार हे दाेघेही एमएच-४०/बीपी-६४७२ क्रमांकाच्या दुचाकीने शिवनी येथून नागपूरकडे येत हाेते. दरम्यान, पवनी गावानजीक चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर नुतेशकुमार हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच देवलापार पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमीला रुग्णालयात हलविले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी नाेंद केली असून, पुढील तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे करीत आहेत.