राष्ट्रपती, पंतप्रधानांसह प्रमुख नेत्यांना पाठविले : अकराही जिल्ह्यातून प्रतिसादनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता रस्त्यासोबतच इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे तब्बल एक लाख सात हजार ई-मेल संपूर्ण विदर्भातून पाठविण्यात आले आहे. यात नागपुरातून सर्वाधिक ३७ हजार ई-मेल राष्ट्रपती व पंतप्रधानांसह प्रमुख नेत्यांना पाठविण्यात आलेले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने या अभिनव आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. आजचे युग हे संगणक आणि स्मार्ट फोनचे आहे. प्रत्येक घरात स्मार्ट फोन आहे. तेव्हा वेगळ्या विदर्भाची मागणी आता या सोशल मीडियासारख्या आधुनिक माध्यमांद्वारे थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आदींना हजारो ई-मेल पाठवून आगळेवेगळे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ ते १८ जुलै दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. यासाठी आघाडीतर्फे पाठवावयाचा एक संदेशही तयार करण्यात आला होता यात विदर्भाची स्थिती, ३६ हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, बेकारी, कुपोषण, प्रदूषण, नक्षलवाद आदी समस्या अधोरेखीत करण्यात आल्या आहेत. वेगळ्या राज्यासाठी तेलंगणमध्ये हिंसात्मक आंदोलन झाले, तसे आंदोलन पुन्हा होऊ नये, अशी विनंती करीत संबंधितांना आपले नाव व जिल्ह्याची माहिती लिहून संदेश पाठवावा, असे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला वैदर्भीय जनतेने विशेषत: तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण विदर्भातून एक लाख सात हजार ई-मेल पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भासाठी एक लाखावर ई-मेल
By admin | Published: July 26, 2016 2:32 AM