मनपाची कारवाई : शोध पथकांनी ११२ प्रतिष्ठानांची तपासणी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी ७ दुकाने प्रतिष्ठानांवर सामाजिक अंतराचे पालन न करण्यासाठी व जैविक कचरा अनधिकृत ठिकाणी फेकण्यासाठी कारवाई करून १ लाख ४५ हजाराचा दंड वसूल केला. पथकानी एस.आर. लिमिटेड लॅबचे डॉ. निरंजन नायक, टेम्पल बाजार रोड यांना बायो-मेडिकल कचरा सामान्य कचऱ्यासोबत अनधिकृत ठिकाणी टाकल्याबददल एक लाख रु. दंड केला आहे. गुरुवारी पथकानी ११२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत आठ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. धरमपेठ झोनअंतर्गत सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन येथील चार प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. परंतु, कुठलाही दंड वसूल करण्यात आला नाही. धंतोली झोनअंतर्गत १३ मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करण्यात आली. नेहरूनगर झोनमधील १६ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रु. दंड वसूल केला.
गांधीबाग झोन क्षेत्रातील सात प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनमधील सहा प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. लकडगंज झोनअंतर्गत एकूण १३ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजाराचा दंड वसूल केला. आशीनगर झोनमध्येही १८ प्रतिष्ठाने तपासली. १५ हजार रुपये दंड केला. मंगळवारी झोनमधील २१ प्रतिष्ठानांची तपासणी केली. एकाला १० हजार रु. दंड केला.