लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आमचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकत घ्या. काही दिवसांनंतर तुम्ही दिलेली रक्कमही परत घ्या, अशी बतावणी करून एका तरुणाचे एक लाख रुपये सायबर गुन्हेगाराने हडपले. रक्कम परत करण्याचे सोडा, जे प्रॉडक्ट खरेदी केले, तेसुद्धा आरोपीने दिले नाही.
२७ जूनला घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर बजाजनगर पोलिसांनी रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
अमित मधुकर अहिरे (वय २७) हे लक्ष्मीनगरात राहतात. २७ जूनला त्यांनी ॲमेझोन ८४ या वेबसाइटवर वेगवेगळे प्रॉडक्ट विक्रीसाठी उपलब्ध दिसले. एका लिंकवर आढळलेल्या मोबाइल नंबरवर अमितने संपर्क केला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने अमितला आगळीवेगळी ऑफर सांगितली. तुम्हाला आमच्या साइटवर जे प्रॉडक्ट आवडले, ते खरेदी करा. काही दिवसांनंतर तुम्ही खरेदीसाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळेल, अशी थाप मारली. आरोपीने त्यासाठी अमितला एक बँक खाते देऊन त्यात १ लाख २ हजार रुपये जमा करण्यास बाध्य केले. ही रक्कम जमा केल्यानंतर अमितने बुक केलेले प्रॉडक्ट आरोपीने पाठविलेच नाही. नंतर, आरोपीने संपर्कच तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अमितने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----