योगेश पांडे
नागपूर : पै पै साठवून घेतलेल्या स्मार्टफोनवर अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल घेणे व त्यावर अगदी मनमोकळेपणाने सर्व मर्यादा तोडत बोलण्याची चूक एका महिलेला चांगलीच महागात पडली. या एका कॉलमुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले अन नाईलाजाने तिला स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न करावा लागला. अनोळखी व्यक्तींनी तर तिला लुबाडत तिच्या परिस्थितीचा फायदा घेतलाच, मात्र तिच्या आपल्या लोकांनीदेखील कठीण प्रसंगात तिची साथ न देता समाजात बदनामी केली. दोन लहान मुले असताना आता आयुष्यात तिला पुढे अंधारच दिसत असून ‘ऑनलाईन’ चुकीचा तिला आता पश्चाताप होत आहे.
समस्य नेटीझन्सला काळजी घेण्याचा संदेश देणारी ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तीसहून कमीच वय असलेली महिला तिची दोन मुले व सासरच्या मंडळींसोबत राहते व धुणीभांडी करून गुजराण करते. तिने पै पै साठवून स्मार्टफोन घेतला आणि फेसबुक खाते उघडले. फेसबुकवर मार्च महिन्यात तिची राहुल खन्ना नामक व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले व त्यानंतर बोलणे सुरू झाले. यु.के.मधील व्यावसायिक असल्याची थाप राहुलने दिली व त्याने तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. महिला त्याच्या बोलण्याला भुलली व त्यानंतर एका क्षणी दोघांनीही ‘न्यूड चॅटिंग’ केली. हीच चूक तिला महागात पडली. समोरच्या व्यक्तीने तिचा व्हिडीओ बनवून ठेवला. त्यानंतर त्याने तिला २ लाख डॉलर्स व काही दागिने गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे सांगितले. संबंधित वस्तू मार्चअखेरीस मुंबई कस्टम्सला पोहोचल्याचे राहुलने सांगितले व त्याने डिलिव्हरी बॉयचा क्रमांक दिला. संबंधित डिलिव्हरी बॉयने विविध शुल्काच्या नावाखाली महिलेकडून दीड लाख रुपये वेळोवेळी घेतले. त्यानंतरदेखील पैशांची मागणी सुरूच ठेवली. महिलेने राहुलला विचारणा केली असता त्याने व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. आपण फसलो असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने १ एप्रिल रोजी घरीच हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला. ती दवाखान्यात असताना नेमका फोन घरी राहिला व तो तिच्या सासऱ्यांच्या हाती पडला. राहुल नावाच्या व्यक्तीकडू वारंवार फोन येत होते व सासऱ्यांनी फोन उचलला असता त्यांना व्हिडीओची बाब कळाली. सासूसासऱ्यांनी तिला सहकार्य न करता संबंधित व्हिडीओ नातेवाईक व शेजारच्या मंडळींमध्ये व्हायरल केला. ही बाब कळल्यावर महिला कोलमडून पडली. मात्र सामाजिक कार्यकर्त्याने हिंमत दिल्याने तिने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी राहुल खन्ना नावाच्या व्यक्तीसोबतच तिच्या सासूसासऱ्यांविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षित नसल्याचा फटका
राहुल खन्नाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढताना यु.के.मधून बोलत असल्याचे सांगितले. तर काही दिवसांनी डॉलर्समध्ये पैसे पाठवत असल्याची बतावणी केली. महिला जास्त शिक्षित नसल्याने तिला यु.के.ची करन्सी नेमकी काय आहे याची माहिती नव्हती. त्यामुळेच त्याच्या भूलथापांवर ती विश्वास ठेवत गेली. हीच तिची मोठी चूक ठरली.