वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनासाठी एक आव्हान ठरते आहे. स्टेशन एक जरी असेल तरी, स्टेशनवर ये-जा करण्यासाठी प्रवेश अनेक आहेत. स्टेशनवरील ठराविक प्रवेशद्वाराबरोबरच असे अनेक पॉर्इंट आहेत जेथून प्रवाशांबरोबरच जनावरांचीही ये-जा आहे. हे रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय धोकादायक आहे. लोकमतच्या टीमने मंगळवारी रेल्वे स्थानकावरील विविध रस्त्यांचा शोध घेतला. यात प्रवेश बंद असतानाही जुगाड करून लोक ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले. आरपीएफच्या गुप्तहेर शाखेजवळील गेटजवळ हे दृश्य बघायला मिळाले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक भिकारी या गेटमधून रेल्वे स्टेशनवर दाखल झाला. गुप्तहेर शाखेच्या कार्यालयापुढे भटकंती करणारे अन्न शिजविताना दिसून आले. बाराखोलीच्या भागात लोखंडाची पट्टी पार करून काही लोक स्टेशन यार्डमध्ये येत होते. येथूनच जनावरे सुद्धा चरण्यासाठी रेल्वेचे रुळ पार करीत होते.
धावत्या रेल्वेतूनच उतरतात प्रवासीहावडा लाईनवर डोबी एरियापासून स्टेशनच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी लोक धावत्या रेल्वेतून उतरताना दिसले. कारण गार्डलाईनहून मोतीबागकडे जाणाऱ्या रेल्वेच्या पुलावरून सहज खाली उतरता येते. स्टेशन यार्डात पीडब्ल्यूआय व सेक्शन इंजिनीअर कार्यालयाजवळ गार्डलाईनकडे जाण्यासाठी एक रस्ता सुरू आहे. येथे गोंदिया व भंडारा येथून येणारे विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी सहज निघून जातात. यार्डच्या याच भागात चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे जीआरपीचे जवान तैनात राहत होते. लोकमतच्या पथकाला दुपारी येथे कुणीच आढळले नाही.
पूर्वेकडील भागात सुरक्षेकडे दुर्लक्षस्टेशनच्या पूर्वेकडील भागात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथून ट्रेनमध्ये सहज चढता येते. मालगोदामाजवळील पान मार्केटसमोर, पूर्वेकडील गेटच्या पायऱ्यांच्या खालून, पार्किंगच्या जवळून असे अनेक रस्ते आहेत.