पौर्णिमा करंदीकर यांची माहिती : मेंदू आजार जागृती सप्ताह नागपूर : अपस्मार (एपिलेप्सी, फिटस्, मिरगी किंवा झटके) हा अत्यंत महत्त्वाचा मेंदूचा आजार आहे. या आजारात मेंदूच्या एका भागातून किंवा पूर्ण मेंदूमध्ये अचानक प्रचंड विद्युतलहरी निर्माण होतात, ज्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. जेव्हा दोनपेक्षा जास्त फिटस्चे अटॅक काही कारण नसताना येतात, तेव्हा त्याला मिरगी जडली आहे, असे सांगितले जाते. साधारणत: दहापैकी एकाला जीवनभरात कधी ना कधी तरी एकदा फिट येते. तसेच १०० जणांमधून एकाला मिरगीचा आजार असू शकतो, अशी माहिती प्रसिद्ध मज्जारोग तज्ज्ञ डॉ. पौर्णिमा करंदीकर यांनी दिली. इंडियन अकादमी आॅफ न्यूरोलॉजी, नागपूर न्यूरो सोसायटी, इंडियन सायक्याट्रिक सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि बसोली ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मेंदू दिनानिमित्त आयोजित मेंदू आजाराविषयी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या शृंखलेत सोमवारी पेठ येथील राज्य कर्मचारी विमा इस्पितळात ‘मेंदूचे आरोग्य व व आजारासंबंधी’या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. करंदीकर मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी मनोविकार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी व इस्पितळाचे प्रभारी कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक लवंगे उपस्थित होते.डॉ. करंदीकर म्हणाल्या, मिरगीचे वेगवेगळे प्रकार असतात. काही छोटे तर काही मोठे, काही शरीराच्या एका भागात तर काही पूर्ण शरीरात. काहींमध्ये शुद्ध हरपते, तर काहींमध्ये फक्त दचकल्यासारखं होणं, अचानक भोवताली संबंध तुटून वापस जुळणं किंवा काही मिनिटांसाठी वर्तणुकीत बदल घडतो. काही मिरगी प्रायमरी असतात. मिरगीचा प्रकार कोणता याची ओळख, प्रत्यक्षदर्शीय अहवाल आणि विविध तपासण्यांमधून लक्षात येते. या आजाराविषयी समाजात खूप अंधश्रद्धा आढळून येतात. भूतप्रेत, जादूटोणा आणि दैवीशक्तीच्या प्रकोपामुळे अटॅक येतात, असा गैरसमज आहे. आज वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीमुळे नवनवीन औषधे मिरगीसाठी उपलब्ध आहेत. ती फक्त प्रभावीच नसून त्यांचे दुष्परिणामदेखील कमी आहेत, असेही त्या म्हणाल्या.डॉ. जोशी यांनी मानसिक आजाराबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला डॉ. सोमण, डॉ. घायवट, डॉ. हुलके, डॉ. जोगेवार, डॉ. अंजली भांडारकर, डॉ. हुमणे, डॉ. चौधरी व डॉ. देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१०० जणांमधून एकाला मिरगी
By admin | Published: July 25, 2014 12:48 AM