लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी आणि सायंकाळी दोन विमान उतरविण्यात आले. यातील एक विमान हैदराबाद येथे खराब वातावरण असल्यामुळे वळविण्यात आले. तर सायंकाळी एका महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे दुसऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
मंगळवारी सकाळी दिल्लीवरून हैदराबादला जात असलेल्या इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट क्रमांक ६ ई २०२२ ने सकाळी ७.४५ वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोल(एटीसी)ला विमान उतरविण्याची परवानगी मागितली. हैदराबादमधील नैसर्गिक वातावरण ठीक नसल्यामुळे तेथे विमान उतरविण्याची परवानगी मिळाली नव्हती. सकाळी ८ वाजता हे विमान नागपूरविमानतळावर उतरले आणि हैदराबाद येथील नैसर्गिक वातावरण ठीक झाल्यानंतर एक तासाने हे विमान हैदराबादकडे झेपावले. त्यानंतर बागडोगरावरून मुंबईला जाणाऱ्या स्पाईसजेट विमानातील एका महिला प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे या विमानाची सायंकाळी ७.२० वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. मेडिकल इमर्जन्सी लँडिंगनंतर महिलेस किंग्स वे येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेचे नाव मायाराणी सरकार आहे. ती आपल्या दोन नातेवाईकांसह बागडोगरा येथून मुंबईला जात होती. ६२ वर्षीय महिला कॅन्सरची रुग्ण आहे. विमानात या महिलेस श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे नातेवाईकांनी याची सूचना पायलटला दिली. त्यानंतर जवळचे विमानतळ म्हणून नागपुरात मेडिकल इमर्जन्सी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलेवर उपचार करीत असलेल्या डॉ. सौरभ प्रसाद यांनी सांगितले की ही महिला स्टेज ४ ची कॅन्सर रुग्ण आहे. प्रवासापूर्वी या महिलेची टेस्ट निगेटिव्ह दाखविण्यात आली. आता या महिलेच्या नातेवाईकांना रस्ते मार्गाने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, या महिलेस प्रवासाची परवानगी द्यायलाच नको होती. या महिलेची आर्थिक स्थितीही चांगली नसल्याची माहिती आहे.
दोन तासानंतर झाले विमान रवाना
उपचारासाठी अधिक वेळ लागल्यामुळे स्पाईसजेटचे विमान रुग्ण महिला आणि तिच्या नातेवाईकांना सोडून १८१ प्रवाशांसह रात्री ९.२३ वाजता मुंबईसाठी रवाना झाले.