लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.बुलडाणा येथून निघालेला भूमिहीनांचा या ‘आसूड’ मोर्चाला मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट रोडवर पोलिसांनी थांबविले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. प्रदीप अंभोरे म्हणाले, अलीकडे भूमिहीनांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर शासन आपले अधिकार दाखवीत असल्याने ते बेघर होत आहेत. दुसरीकडे १०० टक्के कर्जमाफीचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसून येत नाही. यामुळे नैराश्य आलेल्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. हे थांबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देणे व १०० टक्के कर्जमाफीचा निर्णय घेणे, हाच यावर उपाय आहे.या मोर्चाचे नेतृत्व प्रदीप अंभोरे, डॉ. राजीव वाघमारे, महादेवराव वरठे, प्रकाश वानखेडे, अशोक इंगळे, संजय इंगळे, महादेवराव आवळे, मुन्ना पराते, दिलीप रामटेककर आदींनी केले.